Wednesday, June 17, 2026
Latest NewsPUNE

भारतीय सैनिकांनी अरुणाचल प्रदेशमध्ये केली दगडूशेठ गणपतीची प्रतिष्ठापना

पुणे : गणपती बाप्पा मोरया… असा जयघोष थेट अरुणाचल प्रदेशमधील टेंगा व्हॅली येथील चायनीज सिमेवर असलेल्या भारतीय लष्कराच्या ठाण्यावर झाला. मंगलमूर्ती मोरयचा गजर करीत भारतीय लष्करातील १ मराठा बटालियनच्या सैनिकांनी सिमेवरील लष्कराच्या ठाण्यात हुबेहुब दगडूशेठ गणपतींच्या श्रीं ची प्रतिकात्मक मूर्ती स्थापन केली.

सामान्य नागरिकांप्रमाणेच देशाच्या सिमेवर लढणारे सैनिक देखील गणेशाची भक्ती करतात. श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपतीची ख्याती केवळ महाराष्ट्रातच नव्हे, तर सर्वदूर पसरलेली आहे. बाप्पाच्या दर्शनासाठी देशाच्या कानाकोप-यातून भाविक पुण्यात येतात. मात्र, भारतीय सैनिक सिमेवर अहोरात्र पहारा देत असल्याने त्यांना पुण्यामध्ये येता येतच असे नाही.
त्यामुळे १ मराठा बटालियनचे कर्नल जयकुमार मुदलियार यांनी दगडूशेठ गणपतीची प्रतिकृती असणा-या मूर्तीची प्रतिष्ठापना सिमेवरील लष्कराच्या पोस्टमध्ये करण्याची इच्छा सैनिकांच्यावतीने व्यक्त केली होती. ती मूर्ती श्रीमंत दगडूशेठ गणपतीच्या मूर्तीप्रमाणेच असावी, अशी त्यांची मनोमन भावना होती. त्याप्रमाणे ट्रस्टचे अध्यक्ष अशोक गोडसे यांच्याकडे विनंती करणारे पत्र पाठविले होते. त्यानुसार ट्रस्टने सैनिकांच्या इच्छेला मान देऊन श्रीं ची हुबेहुब २ फुटी प्रतिकात्मक मूर्ती देण्याचे मान्य करीत बटालियनला गणेशोत्सवापूर्वी मूर्ती सुपूर्द केली.

ट्रस्टचे कोषाध्यक्ष महेश सूर्यवंशी म्हणाले, मराठा बटालियन दरवर्षी गणेशोत्सव मोठया उत्साहात साजरी करते. त्यामुळे श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपतीच्या प्रतिकात्मक गणेश मूर्तीची स्थापना तेथे करण्यात आली. अरुणाचल प्रदेशमधील सिमेवर देशामधील सर्व राज्यांतील सैनिक कार्यरत असतात. त्यामुळे बाप्पाचा आशीर्वाद सर्व सैनिकांना मिळेल, असेही त्यांनी सांगितले. कर्नल जयकुमार मुदलियार यांनी सिमेवर दगडूशेठच्या श्रीं ची प्रतिकात्मक मूर्ती स्थापना झाल्याबद्दल आनंद व्यक्त केला, तसेच ट्रस्टचेही आभार मानले.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading