निवडणूक आयोगाकडून राज्यसभेची पोटनिवडणूक जाहीर, ४ ऑक्टोबर रोजी मतदान
मुंबई : भारत निवडणूक आयोगाने देशातील विविध कारणांनी रिक्त झालेल्या राज्यसभेच्या पदांसाठी पोटनिवडणूक जाहीर केली आहे. त्यामुळे दिवंगत कोंग्रेस खासदार राजीव सातव यांच्या मृत्यूमुळे रिक्त झालेल्या राज्यातील एका जागेसाठी निवडणूक होणार आहे. या जागेच्या पोटनिवडणुकीसाठी बुधवार दि. 15 सप्टेंबर रोजी अधिसूचना जारी केली जाणार आहे. तर ४ ऑक्टोबर रोजी मतदान प्रक्रिया पार पडेल.
दिवंगत कोंग्रेस खासदार राजीव सातव यांच्या निधनाने रिक्त झालेल्या जागेची मुदत दि. 2 एप्रिल, 2026 पर्यंत आहे. या पोटनिवडणुकीची अधिसूचना जारी केल्याच्या दिनांका पासून बुधवार दि. 22 सप्टेंबर, 2021 पर्यंत नामनिर्देशन दाखल करता येणार आहे. दाखल नामनिर्देशनपत्रांची छाननी दि. 23 सप्टेंबर रोजी केली जाणार असून उमेदवारांना सोमवार दि. 27 सप्टेंबर, 2021 पर्यंत नामनिर्देशन मागे घेता येईल. सोमवार दि. 4 ऑक्टोबर, 2021 रोजी सकाळी 9 वा. ते दुपारी 4 वाजेपर्यंत मतदान घेतले जाणार असून त्याच दिवशी सायं. 5 वा. मतमोजणी केली जाणार आहे.
