भाजप करुणा शर्मा यांच्या पाठीशी- चंद्रकांत पाटील

पुणे: राज्याचे सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांची पत्नी करुणा शर्मा या एकट्या लढत असून भारतीय जनता पार्टी त्यांच्या पाठीशी राहील, अशी ग्वाही प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी बुधवारी पुण्यात पत्रकारांशी बोलताना दिली.

चंद्रकांत पाटील म्हणाले की, धनंजय मुंडे यांनी करुणा शर्मा या त्यांच्या पत्नी आहेत व त्यांना धनंजय मुंडे यांच्यापासून दोन मुले झाल्याची जाहीर कबुली दिली आहे. करुणा शर्मा या परळी येथे गेल्यानंतर त्यांना गुन्ह्यात गोवण्यात आले. त्यांच्या बनावट आवाजात क्लिप तयार करून व्हायरल करण्यात आली. त्यांच्या गाडीत एक महिला पिस्तूल ठेवत असल्याचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे. त्यांच्या गाडीच्या चालकावरही अनुसूचित जाती जमाती अत्याचार प्रतिबंधक कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला असून अटक केली आहे. ॲट्रॉसिटी कायद्याचा इतका दुरुपयोग कधी पाहिला नव्हता. करुणा शर्मा एकट्या लढत आहेत. अशा स्थितीत भाजपा करुणा शर्मा यांच्या पाठीशी राहील. त्यांना न्यायालयात साथ देणे व त्यांच्यासाठी आंदोलन करण्याबाबत विचार करेल.

एका प्रश्नाच्या उत्तरात ते म्हणाले की, पुणे तसेच पिंपरी चिंचवड महानगरपालिकांमध्ये भारतीय जनता पार्टीचे पूर्ण बहुमत आहे तरीही प्रशासन कामे अडवत आहे. सभा तहकुबी ही सुरुवात आहे. प्रशासन काम करू देत नसेल तर भाजपाला आंदोलन करावे लागेल.

Leave a Reply

%d bloggers like this: