ज्यांचा मुख्यमंत्री, त्यांचं सरकार, आम्ही काँग्रेस-राष्ट्रवादीच्या वर – शिवसेना खासदार संजय राऊत 

पुणे : राज्यात जरी तीन पक्षाचे सरकार असले  तरी मुख्यमंत्री ज्यांचा असतो त्यांच सरकार असतं. सरकार आपलं आहे. शिवसेना दोन्ही पक्षांच्या वर आहे. ही आपली पॉवर आहे, असे म्हणत शिवसेना खासदार संजय राऊत यांनी राष्ट्रवादीच्या मतदार संघात जाऊन आपली ‘पॉवर’ दाखवण्याचा प्रयत्न केला. तसेच “शरद पवार आपले आहेत. अजित पवार देखील आपले आहेत. दिलीप वळसे गृहमंत्री असतील, मात्र शिवसेना सगळ्यांच्या वर आहे. भाजपला अजूनही शिवसेनेची गरज लागते”, असं म्हणत राऊत यांनी शिवसेनेचे महत्त्व अधोरेखित केले.

खासदार संजय राऊत हे आज पुणे दौऱ्यावर आहेत. शिरुर लोकसभा मतदार संघातल्या विविध कार्यक्रमांना त्यांनी हजेरी लावली. यावेळी ते बोलत होते. शिरुर लोकसभा मतदारसंघ हा एकेकाळी शिवसेनेचा गड होता. आढळराव पाटील हे तीनवेळा येथून खासदार म्हणून निवडून आले होते. पण 2019 च्या लोकसभा निवडणुकीत राष्ट्रवादीचे अमोल कोल्हे  येथून विजयी झाले. तसेच विधानसभा निवडणुकीत देखील खेड, जुन्नर मतदारसंघात राष्ट्रवादीचे उमेदवार विजयी झाले. या पार्श्वभूमीवर राऊतांचा पुणे-शिरुर दौरा महत्त्वाचा आहे.

आम्ही समोरुन कोथळा काढतो, पाठीमागून वार करण्याची आमची परंपरा नाही… 

‘खंजीर खुपसणं म्हटलं की पहिल नाव शरद पवारांच यायचं मात्र आता उद्धव ठाकरेंचं येतं’, असं चंद्रकांत पाटील म्हणाले होते. याला प्रत्युत्तर देताना राऊत म्हणाले, “चंद्रकांत पाटील यांना मी चंपा म्हणणं बरोबर नाही. ते म्हणाले आमचे 105 आमदार आहेत, तरी आमचा मुख्यमंत्री नाही. त्यांना वाटलं ते येतील, पण आले नाहीत”, असा टोला त्यांनी चंद्रकांतदादांना लगावला. तसंच चंद्रकांत पाटील यांच्या मुख्यमंत्र्यांवरच्या टीकेला देखील राऊतांनी प्रत्युत्तर दिलं. “आम्ही समोरुन कोथळा काढतो, पाठीमागून वार करण्याची आमची परंपरा नाही.. शब्द तुम्ही फिरवला आम्ही नाही”, असं प्रत्युत्तर राऊतांनी चंद्रकांतदादांना दिलं.

Leave a Reply

%d bloggers like this: