‘इंडियास्किल्स महाराष्ट्र २०२१’ ची कौशल्य विकास मंत्री नवाब मलिक यांनी केली घोषणा

मुंबई : शांघाय (चीन) येथे ऑक्टोबर २०२२ मध्ये होणाऱ्या वर्ल्ड स्किल्स चॅम्पियनशिपच्या धर्तीवर ‘इंडिया स्किल्स महाराष्ट्र २०२१’ या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. तरुणांधील नवसंकल्पना आणि उद्योजकतेला चालना देण्याच्या उद्देशाने ही स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे.  विकास मंत्री नवाब मलिक यांनी आज पत्रकार परिषदेत याची घोषणा केली. ३ ते ५ सप्टेंबर दरम्यान राज्यस्तरीय कौशल्य स्पर्धेचे आयोजन करण्यात आले असल्याचे त्यांनी सांगितले.

या पत्रकार परिषदेस कौशल्य विकास विभागाच्या प्रधान सचिव मनिषा वर्मा, कौशल्य विकास सोसायटीचे मुख्य कार्यकारी अधिकारी दीपेंद्रसिंह कुशवाह, राष्ट्रीय कौशल्य विकास महामंडळाचे सिनियर हेड जयकांत सिंह उपस्थित होते.

प्रिंट मीडिया टेक्नॉलॉजी, लँडस्केप गार्डनिंग, इंडस्ट्रियल कंट्रोल, एअरक्राफ्ट मेंटेनन्स, आयटी, अॅग्रीकल्चर, फ्लोरिस्ट्री यासारख्या कौशल्य व्यवसायांमध्ये या स्पर्धांचे आयोजन करण्यात आले आहे. महाराष्ट्र कौशल्य स्पर्धेची अंतिम फेरी ४५ कौशल्य श्रेणींमध्ये ३ ते ५ सप्टेंबर दरम्यान राज्यातील विविध ठिकाणी आयोजित करण्यात आली आहे. राज्यस्तरीय स्पर्धेचे उद्घाटन ३ सप्टेंबर रोजी दुपारी ३ वाजता कुर्ला, मुंबई येथील डॉन बॉस्को औद्योगिक प्रशिक्षण संस्था येथे होणार आहे. तर  ५ सप्टेंबर रोजी सायंकाळी ४ वाजता लोअर परेल, मुंबई येथील आयएसएमई स्कूल ऑफ मॅनेजमेंट अँड एंटरप्रेन्योरशिप येथे समारोप होणार आहे. या स्पर्धेमुळे युवक-युवतीमधील नवसंकल्पना आणि त्यांच्यातील उद्यमशीलता यांना चालना मिळेल, असा विश्वास मंत्री मलिक यांनी व्यक्त केला.

स्पर्धेचे नियोजन तीन फेऱ्यांमध्ये करण्यात आले. लेव्हल १ ची स्पर्धा जिल्हास्तरावर १७ ऑगस्टपासून संपन्न झाली. ही फेरी सर्व जिल्ह्यांतील विविध आयटीआय आणि प्रशिक्षण केंद्रांवर आयोजित करण्यात आली होती. २३ ते २४ ऑगस्ट दरम्यान दुसऱ्या फेरीनंतर २६३ उमेदवार अंतिम फेरीसाठी पात्र झाले आहेत. हे अंतिम स्पर्धक आता राज्यस्तरीय अंतिम फेरीत ३ ते ५ सप्टेंबर दरम्यान मुंबई, पुणे आणि इतर शहरांमधील विविध कौशल्य प्रशिक्षण अकादमी तथा केंद्रांवर स्पर्धेत सहभाग घेतील.

महाराष्ट्र राज्य कौशल्य स्पर्धेतील जवळपास १०० विजेत्यांना सप्टेंबर-ऑक्टोबरमध्ये होणाऱ्या इंडिया स्किल्स २०२१ विभागीय स्पर्धेत आणि पुढे डिसेंबर २०२१ मध्ये इंडिया स्किल्स राष्ट्रीय स्पर्धेत सहभागी होण्याची संधी मिळेल. इंडिया स्किल्स २०२१ मधील विजेत्यांना वर्ल्ड स्किल्ससह विविध आंतरराष्ट्रीय कौशल्य स्पर्धांमध्ये देशाचे प्रतिनिधित्व करण्याची संधी मिळेल.

Leave a Reply

%d bloggers like this: