श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपती ट्रस्ट तर्फे दुसऱ्या सांस्कृतिक महोत्सवाचे 10 ते 19 सप्टेंबर दरम्यान आयोजन

पुणे : कोरोना महासाथीच्या काळात गणेशोत्सवातील सांस्कृतिक कार्यक्रमांची परंपरा कायम सुरू ठेवण्यासाठी हिंदुस्थानातील पहिला सार्वजनिक गणपती श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपती ट्रस्ट आणि उत्सवप्रमुख पुनीत बालन यांनी पुढाकार घेतला आहे. करोनाच्या प्रादुर्भावामुळे यंदाही गणेशोत्सव साजरा करण्यावर राज्य शासनाने निर्बंध घातले असल्याने दुसरा “श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपती ऑनलाइन सांस्कृतिक महोत्सव” आयोजित करण्यात आला आहे. 10 सप्टेंबर ते 19 सप्टेंबर या कालावधीत होणाऱ्या या महोत्सवात कीर्तन, काव्य, चित्रपट संगीत, महाराष्ट्रातील कला, शास्त्रीय संगीत असे विविध कार्यक्रम होणार असून, त्यात प्रख्यात गायक जावेद अली, राकेश चौरासिया, पं. विजय घाटे, चारुदत्त आफळे अशा मान्यवर कलावंतांचा सहभाग आहे. विशेष म्हणजे भारतरत्न पं. भीमसेन जोशी यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त ‘स्वरभास्कर’ हा विशेष कार्यक्रम महोत्सवात सादर होणार आहे.

उत्सवप्रमुख पुनीत बालन यांनी या महोत्सवाविषयी पत्रकार परिषदेत माहिती दिली. या प्रसंगी अध्यक्ष संजीव जावळे, उपाध्यक्ष बाळासाहेब निकम, सचिव दिलीप आडकर, सहसचिव मिलिंद सातव, खजिनदार सुरज रेणुसे आणि विनोद सातव उपस्थित होते.

10 ते 19 सप्टेंबर दरम्यान होणाऱ्या या महोत्सवात ज्येष्ठ कीर्तनकार चारुदत्त आफळे यांचे राष्ट्रीय कीर्तन, प्रसिद्ध गायक जावेद अली यांचा हिंदी गाण्यांचा कार्यक्रम, पं. विजय घाटे यांच्या संकल्पनेतून साकारलेला ‘बियाँड बॉलिवूड’, महाराष्ट्राची सांगीतिक परंपरा उलगडणारा ‘रंग महाराष्ट्राचे’, कवी संदीप खरे आणि वैभव जोशी यांच्या स्वरचित कवितांचा ‘ईर्शाद’,  ‘स्वरभास्कर’ हा भारतरत्न पं. भीमसेन जोशी यांना स्वरवंदना  देणारा पं. आनंद भाटे, पं. जयतीर्थ मेवुंडी, पं. रघुनंदन पणशीकर व पं. शौनक अभिषेकी यांचा कार्यक्रम, ज्येष्ठ बासरीवादक पं. हरिप्रसाद चौरासिया यांना समर्पित स्वरवंदना देण्यासाठी राकेश चौरासिया, अमर ओक, निलेश देशपांडे आणि वरद कठापूरकर यांचा ‘हरि–प्रसाद’, हृषिकेश रानडे, प्रियांका बर्वे, विश्वजित बोरवणकर, आनंदी जोशी यांचा ‘मेहफिल Unlocked’, राजकीय नेत्यांशी गप्पांचा ‘रंगारी कट्टा’ हे कार्यक्रम सादर होणार आहेत. या कार्यक्रमांना भार्गवी चिरमुले, स्वानंदी टिकेकर आणि मिलिंद कुलकर्णी यांच्या बहारदार निवेदनाची साथ असणार आहे. www.bhaurangari.com  या संकेतस्थळावर महोत्सवातील सर्व कार्यक्रम घरबसल्या विनामूल्य पाहता येतील.

Leave a Reply

%d bloggers like this: