शाहीर साबळे यांच्या जन्मशताब्दी वर्षात ‘महाराष्ट्र शाहीर’ चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला

संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्यातील बिनीचे शिलेदार, स्वातंत्र्यसेनानी   कृष्णराव साबळे अर्थात शाहीर साबळे यांचं जन्मशताब्दी वर्ष पुढच्या वर्षी ३ सप्टेंबर २०२२ रोजी सुरू होत आहे. या जन्मशताब्दी वर्षात शाहिरांंना अभिवादन करण्यासह त्यांच्या जीवनकार्याचा वेध ‘महाराष्ट्र शाहीर’ या मोठ्या पडद्यावर येणाऱ्या चित्रपटातून घेतला जाणार आहे.  शाहीर साबळे यांचा नातू आणि दिग्दर्शक केदार शिंदे महाराष्ट्राच्या जडणघडणीतलं शाहिरांचं योगदान मोठ्या पडद्यावर साकारत आहेत.
 
साताऱ्याजवळील पसरणी येथे ३ सप्टेंबर १९२३ रोजी जन्म झालेले कृष्णराव साबळे जेमतेम सातवीपर्यंत शिकले होते. वडील भजन गात असल्यानं लहानपणापासून त्यांच्यावर झालेल्या संगीताच्या संस्कारातून त्यांच्यातला कलावंत घडला. लहानपणापासूनच सामाजिक चळवळींशी जोडले गेल्यानं त्यांना साने गुरुजी, क्रांतीसिंह नाना पाटील, भाऊराव पाटील, सेनापती बापट यांचा सहवास लाभला. १९४२च्या चले जाव चळवळीत, स्वातंत्र्यानंतर गोवा आणि हैद्राबाद मुक्तीसंग्राम, संयुक्त महाराष्ट्र चळवळीतही त्यांचा सक्रीय सहभाग होता. ‘संंयुक्त महाराष्ट्र चळवळीतली तोफ’ असं त्यांना म्हटलं जायचं. कलावंत असल्यानं समाजातील त्रुटी, दोष लक्षात घेऊन त्यांनी अनेक समाज प्रबोधन करणारी प्रहसनं लिहिली. ‘जय जय महाराष्ट्र माझा…’ या महाराष्ट्र गीतासह ‘या गो दांड्यावरून….’, ‘जेजुरीच्या खंडेराया जागराला या या….’ अशी दर्जेदार लोकगीतं महाराष्ट्राला  दिली. महाराष्ट्रात फिरून लोकगीतं संकलित करून त्यांची पहिली रेकॉर्ड केली, रंगभूमीवर मोबाईल थिएटरचा पहिला प्रयोग शाहीर साबळे यांनीच केला. तर तमाशा या लोककला प्रकाराला आधुनिक नाटकाशी जोडणं, मुक्त नाट्य हा नवा प्रकार निर्माण करणं असं अमूल्य योगदान शाहीर साबळे यांनी दिलं. लोककलेच्या क्षेत्रात फार मोलाचं योगदान दिलेल्या या महान कलावंताचा पद्मश्री, संगीत नाटक अकादमी, महाराष्ट्र गौरव अशा अनेक पुरस्कारांनी सन्मान करण्यात आला.
 
आता शाहीर साबळे यांंच्या ३ सप्टेंबर २०२२ पासून सुरू होणाऱ्या जन्मशताब्दी वर्षात त्यांच्या जीवनकार्याचा वेध ‘महाराष्ट्र शाहीर’ या चित्रपटातून घेतला जाणार आहे. अनेक नाटकं, टीव्ही मालिका केलेल्या ज्येष्ठ लेखिका आणि दिग्दर्शिका प्रतिमा कुलकर्णी ‘महाराष्ट्र शाहीर’ चित्रपटाचं लेखन करत आहेत. तर शादिग्दर्शक केदार शिंदे हा चित्रपट दिग्दर्शित करत आहेत. रंगभूमी, टीव्ही मालिका आणि चित्रपट या तिन्ही माध्यमांमध्ये केदार शिंदे यांनी दमदार काम केलं आहे. नातवानंच आपल्या आजोबांवर चित्रपट करण्याचा दुर्मीळ योग या चित्रपटामुळे जुळून येणार आहे.
 

Leave a Reply

%d bloggers like this: