प्रलंबित अर्ज त्वरित निकाली काढा अन्यथा २२ सप्टेंबर पासून बेमुदत धरणे – घरेलू कामगारांचा इशारा!

पुणे : पुण्यामध्ये ८०००० घरेलू कामगारांची महाराष्ट्र घरेलू कामगार कल्याण मंडळाकडे नोंद असताना जेमतेम ५००० कामगारांना एप्रिल मध्ये जाहीर केलेले रु १५०० कोव्हीड अर्थसहाय्य मिळाले आहे; हजारो नवीन नोंदणी आणि नूतनीकरणाचे अर्ज कामगार आयुक्त कार्यालयात पडून आहेत. याकडे अनेक वेळा प्रशासनाचे लक्ष वेधून सुद्धा कामाला गती येत नाही, याचा तीव्र निषेध आज घरेलू कामगारांनी अपर कामगार आयुक्त श्री पोळ यांच्या कडे नोंदवला.

शहरातील अनेक घरेलू कामगार आपल्या अर्जांबद्दल वारंवार विचारणा करीत असून, त्यांच्या मध्ये प्रचंड असंतोष पसरला आहे. अर्थसहाय्य मिळण्याची प्रणाली सुलभ करून जादा कर्मचारी वर्ग नेमून नवीन नोंदणी प्रक्रियेला वेग आणला नाही तर दिनांक २२ सप्टेंबर पासून पुणे जिल्हा घरकामगार संघटने मार्फत कार्यालयासमोर बेमुदत धरणे आंदोलन सुरु केले जाईल असा इशारा आज संघटने तर्फे देण्यात आला.

कामगार आयुक्त कार्यालयासमोर विविध भागातल्या घरेलू कामगारांनी जमून निदर्शने केली, व निवेदन सादर केले. ग्रामीण भागातील अर्ज स्वीकारण्यासाठी तालुक्याच्या ठिकाणी कॅंप लावावेत आणि केंद्र सरकारने असंघटीत कामगारांसाठी सुरु केलेल्या नवीन श्रम पोर्टलवर मंडळामार्फत घरेलू कामगारांची परस्पर नोंद करून घेण्याची व्यवस्था करावी अशी ही मागणी संघटनेकडून करण्यात आली. संघटनेच्या अध्यक्ष किरण मोघे, सचिव सरस्वती भांदिर्गे, खजिनदार रेखा कांबळे, सहसचिव अपर्णा दराडे, सीटू चे सचिव वसंत पवार, गणेश दराडे, मोहन पोटे आणि शहरातल्या विविध भागातून १०० पेक्षा अधिक घरेलू कामगारांचा या आंदोलनात सहभाग होता.

Leave a Reply

%d bloggers like this: