माहीर, दर्शन आणि माही यांना पटकाविला प्रथम क्रमांक

पुणे : माहीर मोर्बिया, माही ललवाणी आणि दर्शन गांधी यांनी जैन सोशल ग्रुप यूथ पुणे सेंट्रल यांच्यावतीने घेण्यात आलेल्या परिवर्तन अॅक्ट ऑफ काईंडनेस या राष्ट्रीय स्पर्धेत आपापल्या गटातून प्रथम क्रमांक पटकाविला. देशाभऱातून १४०० स्पर्धकांनी या स्पर्धेत सहभाग घेतला होता.

या स्पर्धेचा निकाल आणि बक्षीस वितरण समारंभाचे ऑनलाईन आयोजन करण्यात आले होते. यावेळी माजी आयपीएस ऑफिसर किरण बेदी यांनी निकाल जाहिर केले. ऑल इंडिया जैन कॉन्फरन्स, महिला विभाग प्रमुख विमल बाफना, ग्रुपचे अध्यक्ष प्रितम भटेवरा, आनंद चोरडिया,  भंडारी, धीरज ओस्तवाल, दीपा बाफना, प्रिती बर्मेचा यांसह इतर सहकारी उपस्थित होते. भारतासह सिंगापूर, दुबई, बँकॉक, नायजेरिया आणि जर्काता आदी देशांमधून देखील स्पर्धकांनी सहभाग घेतला होता.  जैन सोशल ग्रुप इंटरनॅशनल फेडरेशन आणि आॅल इंडिया जैन कॉन्फरन्स यांचे सहकार्य देखील उपक्रमाला मिळाले.

किरण बेदी म्हणाल्या, देण्याची प्रवृत्ती महत्त्वाची आहे. परंतु कोणालाही काही देताना त्यामागे कोणताही स्वार्थ नसावा. दुसर्‍यांच्या भल्याचा विचार करुन आणि आपला अहंकार, मी पणा मागे ठेऊन मदत करायला हवी. जो आपली मदत घेतो, त्यांचे आपण आभार मानायला हवेत. आपल्याकडे जे आहे ते आपले नाही. ते ईश्वराचे आहे, ही भावना मनात रुजायला हवी. कोणालाही मदत करताना गर्व भावना नसावी तर नम्रता असावी. पालकांनी तन मन आणि धन या तीनही गोष्टी देऊन मुलांना घडवायला हवे. पालकांचा वेळ, घरातील चांगले सकारात्मक वातावरण मुलांच्या जडणघडणीत महत्त्वाचे आहे. केवळ धन देऊन  मुले भविष्यासाठी घडणार नाहीत, चांगली मूल्ये देऊन मुलांना घडवायला हवे.

७ ते ९ वर्षे वयोगटात माहीर मोर्बिया याने प्रथम युगम खिंवसरा याने द्वितीय तर ऐश्वी जैन हिने तृतीय क्रमांक पटकाविला. ९ ते १२ वर्षे वयोगटात  माही ललवाणी हिने प्रथम, विभा पगारिया हिने द्वितीय तर धीर शाह यांनी तृतीय क्रमांक पटकाविला. १२ ते १५ वर्षे वयोगटात दर्शन गांधी याने प्रथम, हर्षित चोरडिया यांना द्वितीय, तर सुयश जैन यांनी तृतीय क्रमांक मिळविला.

प्रितम भटेवरा म्हणाले, लहान मुलांमध्ये दयाभाव व सत्कृत्य करण्याची भावना जागृत करण्याकरीता स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. तब्बल 4 लाखांची 108 पारितोषिके या स्पर्धेत देण्यात आली आहेत.

Leave a Reply

%d bloggers like this: