Pune – हडपसरच्या बल्लूसिंग टाक टोळीवर मोक्का; पोलिस आयुक्तांच्या कारवाईची फिफ्टी

पुणेः वर्चस्वाच्या लढाईतून आणि दहशत निर्माण करण्यासाठी शहरात गुन्हेगारी टोळ्या पुन्हा अॅक्टिव्ह झाल्या आहेत. तर या टोळ्यांना वचक बसविण्यासाठी पोलिसही सक्रिय झाले आहेत. त्या अनुषंगाने पोलिस आयुक्त अमिताभ गुप्ता यांनी हडपसरमधील बल्लूसिंग टोळीतील 6 जणांवर मोक्काअंतर्गत कारवाई केली आहे. पोलीस आयुक्तांच्या 11 महिन्याच्या कालावधीतील ही 50 वी कारवाई आहे. त्यामुळे गुन्हेगारांचे धाबे दणाणले आहेत.

बल्लूसिंग प्रभूसिंग टाक, उजालासिंग प्रभूसिंग टाक, जलसिंग रजपुतसिंग दुधानी (तिघेही रा. रामटेकडी, हडपसर), सोमनाथ महादेव घारोळे (रा. म्हाडा वसाहात, हडपसर), पिल्लूसिंग कल्लूसिंग जुन्नी (रा. गोसावीवस्ती, हडपसर),गोरखसिंग गागासिंग टाक (रा. बिराजदार वस्ती, हडपसर) असे कारवाई करण्यात आलेल्यांची नावे आहेत.

याबाबतची माहिती अशी की, 5 जुलै रोजी मध्यरात्री आरोपी पंचरत्न सोसायटीतील दोन सदनिकांमध्ये चोरी करून पळून जाताना पोलिसांना त्यांचा पाठलाग केला होता. त्यावेळी आोरपीनी त्यांच्याजवळील शस्त्राने पोलिसांवर हल्ला केला होता. या प्रकरणी पोलिसांनी आरोपी बल्लूसिंग यांच्यासह 6 जणांवर कोथरुड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला होता. दाखल गुन्ह्याचा तपास करत असताना बल्लूसिंग हा त्याच्या साथीदाराच्या मार्फत 2008 पासून गुन्हेगारी कारवाया करत असल्याचे समोर आले.

या टोळीने दरोडा, जबरी चोरी, खुनाचा प्रयत्न करणे, घातक शस्त्र बाळगणे, दहशत माजवणे असे गुन्हे केले आहेत. या टोळीवर यापूर्वी तडीपारीची कारवाई केली होती. तरी देखील त्यांच्या गुन्हेगारी कारवाया सुरुच होत्या. त्यामुळे त्यांच्यावर मोक्काअंतर्गत कडक आणि ठोस कारवाई करण्यासाठी कोथरुडचे वरीष्ठ पोलिस निरीक्षक मेघश्याम डांगे यांनी अपर पोलिस आयु्क्त संजय शिंदे, पोलिस उपायुक्त पोर्णिमा गायकवाड यांच्याकडे प्रस्ताव पाठवला होता. त्यांनी हा प्रस्ताव पोलिस आयुक्त अमिताभ गुप्ता यांच्याकडे पाठवला होता. त्यानुसार पोलिस आयुक्तांनी ही कारवाई केली आहे.

Leave a Reply

%d bloggers like this: