Wednesday, June 17, 2026
ENTERTAINMENTLatest News

प्रथमेश परबच्या आगामी ‘एक नंबर’ चित्रपटाचे मोशन पोस्टर सोशल मिडियावर प्रदर्शित

‘टकाटक’च्या माध्यमातून रसिकांचं यशस्वी मनोरंजन केल्यानंतर मिलिंद कवडे नेमके कोणत्या प्रकारचा नविन चित्रपट घेऊन येणार याबाबत कुतुहल निर्माण झालं होतं. पहिल्या चित्रपटापासून रसिकांची आवड ओळखून आपल्या मनातील विषय यशस्वीपणे सादर करणारे मिलिंद पुन्हा एकदा  नव्या चित्रपटाच्या माध्यमातून मनोरंजन करण्यासाठी सज्ज झाले आहेत. मिलिंद कवडेंच्या दिग्दर्शनाखाली तयार झालेल्या ‘एक नंबर’ या आगामी मराठी चित्रपटाचं लक्षवेधी मोशन पोस्टर नुकतंच सोशल मीडियावर रिलीज करण्यात आलं आहे.

धुमाळ प्रोडक्शनच्या बॅनरअंतर्गत तसेच आऊट ऑफ द बॉक्स फिल्म्सच्या सहयोगाने तयार झालेल्या ‘एक नंबर’ या चित्रपटाची निर्मिती करण्याची जबाबदारी महेश शिवाजी धुमाळ, जितेंद्र शिवाजी धुमाळ आणि मिलिंद कवडे यांनी सांभाळली आहे. ‘येडयांची जत्रा’पासून मिलिंद यांनी सुरू केलेला दिग्दर्शनातील प्रवास ‘टकाटक’सारख्या हिट चित्रपटासोबत ‘एक नंबर’ या सिनेमापर्यंत येऊन पोहोचला आहे. यावेळी मिलिंद मिस्ट्री कॉमेडीच्या माध्यमातून प्रेक्षकांचं मनोरंजन करणार असल्याची झलक रिलीज करण्यात आलेल्या मोशन पोस्टरमध्ये पाहायला मिळते. ‘एक नंबर’ या चित्रपटाबाबत मिलिंद म्हणाले की, चित्रपटाच्या कथेला पूरक शीर्षक ठेवणं हे त्यातील विषयाला न्याय देण्यासाठी गरजेचं असतं. या चित्रपटाचं ‘एक नंबर’ हे शीर्षकही कथानकाला साजेसं असल्यानंच ठेवण्यात आल्याचं रसिकांना चित्रपट पाहिल्यावर जाणवेल. या माध्यमातून मिस्ट्री कॉमेडी हा जॉनर हाताळला असून, प्रेक्षक त्याला नक्कीच दाद देतील अशी आशाही मिलिंद यांनी व्यक्त केली आहे.

‘टकाटक’च्या यशानंतर मिलिंद यांच्या ‘एक नंबर’ या चित्रपटातही प्रथमेश परब मुख्य भूमिकेत झळकणार आहे. प्रथमेशच्या जोडीला मिलिंद शिंदे, गणेश यादव, निशा परूळेकर, अभिलाषा पाटील, आयली घिया, ऋषिकेश धामापूरकर, अक्षता पाडगावकर, प्रणाली संघमित्रा धावरे, सुमित भोक्से, सुनिल मगरे, हरिष थोरात, आकाश कोळी आदी कलाकार आहेत. या चित्रपटाची कथा, पटकथा मिलिंद कवडे यांनीच लिहिली असून संवादलेखन संजय नवगिरे यांनी केलं आहे. हजरत शेख (वली) या चित्रपटाचे डीओपी आहेत. पटकथा सहाय्यक म्हणून संजय नवगिरे आणि सुनिल मगरे यांनी काम पाहिले आहे. संकलन प्रणव पटेल यांनी केलं असून पार्श्वसंगीत अभिनय जगताप यांनी दिलं आहे. जय अत्रेनं लिहिलेल्या गीतरचना संगीतकार वरूण लिखते यांनी संगीतबद्ध केल्या आहेत.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading