fbpx

सावकारी, चायनीज गाडी अन्‌ घरफोडी – 30 गुन्हे उघडकीस तर 77 लाख 47 हजारांचा मुद्देमाल जप्त

पिंपरी : दिवसा सावकारी, सायंकाळी चायनीजची गाडी आणि मध्यरात्री घरफोडी चोऱ्या करणाऱ्या एका चोरट्याला चिंचवड पोलिसांनी अटक केली आहे. त्याच्याकडून घरफोडीचे 30 गुन्हे उघडकीस आणत 77 लाख 47 हजार 200 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

लखन अशोक जेटीथोर (वय 32, रा. वाल्हेकरवाडी, चिंचवड) असे अटक केलेल्या अट्टल चोरट्याचे नाव आहे. त्याच्यासह रवी शिवाजी भोसले (वय 42, रा. रहाटणी), सुरेश नारायण जाधव (वय 42, रा. रहाटणी) यांना देखील अटक केली आहे. त्यांचा चौथा साथीदार कृष्णा जाधव सध्या फरार असून पोलीस त्याचा शोध घेत आहेत. पोलीस आयुक्त कृष्ण प्रकाश यांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी लखन चायनीजची गाडी लावून त्यावर आपली उपजीविका चालवत असल्याचे दाखवत होता. दिवसा बंद घरांची रेकी करून रात्री चायनीजची गाडी बंद केल्यावर घरे बंद असल्याची खात्री करून मध्यरात्री घरफाडी करीत असे. घरफोडीसाठी लागणारी हत्यारे आजूबाजूच्या परिसरात अडगळीच्या ठिकाणी टाकत असे.

घरफोडींचा तपास करताना एक सीसीटीव्ही फुटेज पोलिसांच्या हाती लागले. त्यात एक संशयित व्यक्ती मास्क लावून जात असताना दिसली. मात्र एका विशिष्ट ठिकाणी गेल्यावर संशयित व्यक्ती सीसीटीव्ही कॅमेऱ्यात आढळत नसे. त्यामुळे पोलिसांनी संशयित आरोपीची माहिती काढून ओळख पटवली. लखन याच्यावर सन 2009 ते 2012 या कालावधीत सोलापूर शहर पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीत नऊ गुन्हे दाखल आहेत.

लखन साथीदार आरोपी रवी आणि सुरेश यांच्या मदतीने घरफोडी केलेला माल विकत असे. लॉकडाऊनच्या कालावधीत चोरीचा माल विकला गेला नाही. चोरीच्या पैशातून तो सावकारी करत असे. त्यातूनच त्याने एकाकडून फॉर्च्यूनर कार जबरदस्तीने आणली होती. या कारवाईमुळे चोरी केलेले 78 तोळे सोने, 10 टीव्ही, गुन्ह्यासाठी वापरलेली फॉर्च्यूनर असा एकूण 77 लाख 47 हजार 200 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.

Leave a Reply

%d bloggers like this: