श्री शिवाजी मराठा सोसायटीच्या मानद सचिवपदी अण्णा थोरात यांची बहुमताने निवड

पुणे : श्री शिवाजी मराठा सोसायटीच्या नियामक मंडळाची निवडणूक पार पडली. त्यात राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी शहराध्यक्ष आणि अखिल मंडई मंडळाचे अध्यक्ष अण्णा थोरात यांची मानद सचिवपदी बहुमताने निवड झाली आहे. अण्णा थोरात आणि माजी मंत्री तसेच विद्यमान उपाध्यक्ष माणिकराव सातव यांच्यात ही लढत झाली.

श्री शिवाजी मराठा सोसायटीच्या 100, 101 आणि 102 वी वार्षिक सर्वसाधारण सभा पार पडली. त्यामध्ये बहुमताने अण्णा थोरात यांचे पॅनल निवडून आले. थोरात यांनी सर्वच पंचवीस जागांसाठी पॅनल उभारले होते. श्री शिवाजी मराठा सोसायटीच्या अध्यक्षपदी श्रीमंत छत्रपती शाहू महाराज, कोल्हापूर, उपाध्यक्षपदी राजेंद्र जगताप तर मानद सचिवपदी अण्णा थोरात, मानद सहसचिवपदी विकास गोगावले, खजिनदारपदी जगदीश दिघे यांची व संस्थेच्या नियामक मंडळाच्या सर्व २५ सभासदांची बहुमताने निवड झाली. सोसायटीचे 450 सभासद असून त्यातील सुमारे पावणे चारशे सभासद पुणे शहर आणि हवेली तालुक्यातील आहेत. इतर सभासद ठाणे, मुंबई, कोल्हापूर, सातारा तसेच बडोद्याचे आहेत.

श्री शिवाजी मराठा सोसायटीच्या नियामक मंडळाची मुदत पाच वर्षांची असते. सोसायटीच्या नियामक मंडळाचे सचिवपद कार्यकारी असून संस्थेचा कारभार चालविण्याचे अधिकार सचिव पदाला आहेत.

अण्णा थोरात म्हणाले, शिक्षणाची मोठी परंपरा असलेल्या श्री शिवाजी मराठा सोसायटीच्या मानद सचिवपदी निवड होणे ही निश्चितच आनंदाची गोष्ट आहे. संस्थेच्या सर्वांगीण विकास कसा करता येईल, याकडे विशेष लक्ष देणार आहे. अद्ययावत शिक्षण तसेच क्रीडा प्रशिक्षणाकडे देखील प्रामुख्याने लक्ष देणार असल्याचे त्यांनी सांगितले.

शिक्षणाचे माहेरघर असलेल्या पुण्यात राज्यातील बहुजन समाजातील विद्यार्थ्यांना अल्पदरात शिक्षण मिळावे म्हणून श्री शिवाजी मराठा सोसायटीची स्थापना करण्यात आली होती. गुरुवर्य बाबूराव जगताप केशवराव जेधे यांच्या कुटूंबियांनी श्री शिवाजी मराठा सोसायटीची स्थापना केली, ज्याचा विस्तार आता मोठ्या प्रमाणात झाला आहे. संस्थेत सध्या राज्याच्या वेगवेगळ्या भागातून आलेले सुमारे ४ हजार विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. ऑफिस सुप्रिटेंडंट दत्तात्रय पाटील यांनी सूत्रसंचालन केले. अजय पाटील यांनी आभार मानले.

Leave a Reply

%d bloggers like this: