प्रेयसीचा खून करून मृतदेहाचे तुकडे फेकून देणारा प्रियकर गजाआड 

पुणे : प्रेयसीकडून सतत होणार्‍या त्रासाला कंटाळून प्रेयसीचा खून  करून तिच्या मृतदेहाचे तुकडे भुगाव ते लवासा घाट परिसरात फेकून देणार्‍या प्रियकराला तब्बल बारा दिवसानंतर आज अटक करण्यात आली. गुन्हे शाखेच्या खंडणी विरोधी पथकाने ही कारवाई केली. हनुमंत अशोक शिंदे (वय 40, रा. 277, बुधवार पेठ) असे आरोपीचे नाव असून रोजिना रियाज पानसरे उर्फ कविता चौधरी (वय 30, रा. बुधवार पेठ) असे खून झालेल्या महिलेचे नाव आहे. याप्रकरणी, विश्रामबाग पोलिस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी हनुमंत शिंदे यांचे बुधवार पेठेत मोबाईल दुरूस्तीचे दुकान आहे. तर मृत महिला ही देहविक्रीचा व्यावसाय करायची.  हनुमंत हा विवाहित असूनसुद्धा त्या दोघांमध्ये अनैतिक संबंध होते. हनुमंतने रोजिनाला नारायण पेठेत फ्लॅट भाड्याने घेऊन दिला होता. रोजिना हनुमंतला त्याच्यासोबत राहण्यास सांगत असे. याविषयांवरून दोघांमध्ये सतत वाद होत असत. 12 ऑगस्टच्या रात्री हनुमंत आणि रोजिनामध्ये याच विषयावर वाद झाला.  अन् रागाच्या भरात हनुमंतने रोजिनाचा गळा दाबून खून केला. त्यानंतर तो फ्लॅट बंद करून अक्कलकोटला पळून गेला होता. तब्बल तीन दिवस रोजिनाचा मृतदेह घरातच पडून होता. नंतर परत आल्यावर हनुमंतने मित्राचा छोटा चारचाकी टेम्पो सामान शिफ्ट करण्याच्या बहाण्याने घेतला. कोयत्याने रोजिनाच्या मृतदेहाचे तीन तुकडे करून ताडपत्रीच्या पिशवीत भरून भुगाव ते लवासा घाट परिसरात वेगवेगळ्या ठिकाणी फेकून दिले.

दरम्यान, बुधवारपेठेत देहविक्री करणारी एक महिला बेपत्ता असल्याची माहिती पोलिस कर्मचारी लांडगे यांना मिळाली होती. त्यानुसार तपास केला असता संबंधीत महिलेचे हनुमंत शिंदे याच्यासोबत अनैतिक संबंध असल्याची माहिती पोलिसांच्या हाती लागली. संशय आल्याने पोलिसांनी हनुमंत शिंदे याला ताब्यात घेतले. चौकशीअंती आपणच रोजिनाचा खून केल्याचे हनुमंतने कबूल केले. त्यानंतर वरिष्ठ पोलिस निरीक्षक महेंद्र जगताप, सहाय्यक पोलिस निरीक्षक संदीप बुवा यांच्या पथकाने भुगाव ते लवासा घाट परिसरातील विविध ठिकाणचे मृतदेहाचे तुकडे जमा केले. पंचनामा केल्यानंतर या मृतदेहाच्या पिशव्या शवविच्छेदनासाठी ससून रुग्णालयात पाठविले आहेत. ही कामगिरी उपायुक्त श्रीनिवास घाडगे, वरिष्ठ निरीक्षक महेंद्र जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली कर्मचारी पांडुरंग वाजंळे, यशवंत ओंबासे, मधुकर तुपसौंदर, हनुमंत कांदे, अमर पवार यांच्या पथकाने केली.

Leave a Reply

%d bloggers like this: