आज कोकण, विदर्भासह दक्षिण मध्य महाराष्ट्रात दमदार पावसाचा अंदाज

पुणे: राज्यात हळूहळू पावसाला पोषक हवामान निर्माण होत असून, पुन्हा पावसाला सुरूवात होण्याचे संकेत आहेत.आज कोकणात अनेक ठिकाणी, विदर्भ, दक्षिण मध्य महाराष्ट्रात काही ठिकाणी दमदार, तर उर्वरीत राज्यात तुरळक ठिकाणी पावसाचा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे.

मॉन्सूनचा आस असलेला कमी दाबाचा पट्टा हिमालयाच्या पायथ्याकडे सरकला आहे. दोन दिवसात मॉन्सूनचा आस त्याच्या सर्वसामान्य स्थितीत येण्याचे संकेत आहेत. यातच कर्नाटकपासून केरळपर्यंत किनारपट्टीला समांतर हवेचा कमी दाबाचा पट्टा तयार झाला आहे. उत्तर केरळच्या किनाऱ्यालगत समुद्र सपाटीपासून १.५ किलोमीटर उंचीवर चक्राकार वाऱ्यांची स्थिती आहे.

राज्यात २७ ऑगस्ट रोजी विभागनिहाय पडणाऱ्या पावसाचा अंदाज
पावसाला पोषक हवामान होत असल्याने राज्यात काही ठिकाणी ऊन सावल्यांच्या खेळात हलक्या श्रावण सरी पडण्यास सुरूवात झाली आहे. हिमालयाकडे गेलेला मॉन्सूनचा आस सर्वसामान्य स्थितीत आल्यानंतर महाराष्ट्रासह मध्य आणि पश्चिम भारतात पावसाचे प्रमाण वाढण्याची शक्यता आहे.

राज्यात २७ ऑगस्ट रोजी जिल्हानिहाय पावसाचा इशारा
शुक्रवारी (ता. २७) पूर्व विदर्भातील भंडारा, गोंदिया, गडचिरोली, चंद्रपूर, नागपूर, वर्धा जिल्ह्यात तुरळक ठिकाणी विजा, मेघगर्जनेसह हलक्या पावसाचा अंदाज आहे. कोकण अनेक ठिकाणी, विदर्भ, दक्षिण मध्य महाराष्ट्रात काही ठिकाणी तर उर्वरीत राज्यात तुरळक ठिकाणी पावसाचा अंदाजही हवामान विभागाने वर्तविला आहे.

पावसाने उघडीप दिल्याने उन्हाचा वाढलेला चटका कायम असून, अनेक ठिकाणी कमाल तापमानाचा पारा ३२ अंशांच्या पुढेच आहे. गुरूवारी (ता. २६) विदर्भातील चंद्रपूर येथे सर्वाधिक ३४.० सेल्सिअस तापमानाची नोंद झाली.

Leave a Reply

%d bloggers like this: