अंदाजपत्रकात नागरिकांच्या सूचनांना स्थान देण्याची मागणी
पुणे: महापालिकेच्या २०२१-२२ च्या अंदाजपत्रकात विकासकामांच्या संदर्भात नागरिकांच्या सूचनांना स्थान देण्याची मागणी स्वयंसेवी संस्थांच्या वतीने पालिका आयुक्तांकडे करण्यात आली आहे.आयुक्तांनी अर्थसंकल्प सादर केल्यावर स्थायी समिती अध्यक्ष,नगरसेवकांनी सुचविलेल्या कामांच्या ‘स ‘ यादीतील अनावश्यक कामांसाठी पुणेकर करदात्यांचा पैसा उधळू नये.सार्वजनिक स्वच्छतागृहे,कचरा नियोजन व व्यवस्थापन,छोट्या बाजारपेठा,वाहनतळ,मूलभूत गरजांच्या पूर्ततेसाठी आवश्यक तरतूद करावी,अशी मागणी ‘इनक्रेडिबल समाजसेवक ग्रुप’ च्या वतीने अध्यक्ष असलम इसाक बागवान यांनी पत्रकाद्वारे केली आहे.
‘गरीब-श्रमिक वर्गामध्ये ज्या सोयीसुविधांचा अभाव आम्हाला जाणवतो त्यांच्या पूर्ततेसाठी धोरणात्मक निर्णय घेतले जावे व त्यासाठी अंदाजपत्रकात पुरेशी तरतूद केली जावी,कोरोना साथीनंतर पालिकेची अर्थव्यवस्था अजून सुधारलेली नाही हेही लक्षात घ्यावे’,असे या पत्रकात म्हटले आहे.
‘इनक्रेडिबल समाजसेवक ग्रुप’ ने सुचविलेली कामे पुढीलप्रमाणे :
- कोविडच्या काळात एकूणच जनजीवन विस्कळीत झाले ते अद्याप पूर्वपदावर आलेले नाही. अद्यापही रोजगार संपूर्णपणे सुरू झाला नाही. हजारो लोक बेरोजगार झालेले आहेत. अशा स्थितीत मूलभूत गरजांची पूर्तता करण्यास बजेटमध्ये तरतूद व त्यासाठी पुरेसा निधी उपलब्ध होणे आवश्यक आहे.
- सार्वजनिक स्वच्छतागृहांची पुरेशी व्यवस्था करावी. खास करून नव्याने विकसित होत असलेल्या भागात सार्वजनिक स्वच्छतागृहांची सोय नाही, ती लवकरात लवकर केली जावी.
- वस्ती पातळीवर घंटागाड्या, रहिवासी सोसायट्या व शहर भागात एकत्रितपणे नियमित कचरा उचलण्याची व्यवस्था अपुरी आहे. ती पुरेशी करण्यात यावी. याशिवाय, किमान दर 500 मीटर्सवर सार्वजनिक कचराकुंड्या उपलब्ध कराव्या व तेथील कचराही नियमितपणे उचलला जाईल अशी व्यवस्था करावी. त्यासाठी आवश्यक ती तरतूद अंदाजपत्रकात करण्यात यावी.
- गावठाणांमध्ये अनधिकृत बांधकामांमुळे तसेच अनधिकृत दुकाने, फेरीवाले, भाजीवाले इत्यादी व्यावसायिकांमुळे आधीच अरुंद असलेले रस्ते अधिक अरुंद बनत आहेत व अनेक ठिकाणी रहदारीला अडथळा ठरत आहेत. त्यासाठी पर्यायी जागा उपलब्ध होणे आवश्यक आहे.
- मध्यवर्ती भागातील महापालिकेच्या आरक्षित जागांमध्ये सार्वजनिक पार्किंगची व्यवस्था केली जावी वरील सर्व कार्यामध्ये रोजगारनिर्मितीही होईल व त्यातून बेरोजगार हाताना काम मिळून त्यांची क्रयशक्तीही वाढेल व पर्यायाने महानगरपालिकेच्या कार्यकक्षेतील नागरी जीवनाची स्थिती सुधारून महापालिकेच्या महसुलातही वाढच होईल. या सर्व मुद्द्यांचा अंदाजपत्रकात प्राधान्याने विचार व्हावा .
शहरातील विकासकार्य व त्याची तरतूद या संदर्भात वॉर्ड स्तरावर नागरिकांच्या सहभागाने प्राधान्यक्रमाची निश्चिती व्हावी
