शेतकऱ्यांना देशोधडीला लावून केलेला विकास आम्हाला अमान्य -चंद्रकांत पाटील

पुणे : शेतकऱ्यांना देशोधडीला लावून केलेला विकास आम्हाला अमान्य आहे. जुन्या आराखड्यानुसारच रिंग रोड करा, जर तुम्ही तसे करणार नसाल, तर आमचा कडवा विरोध असेल, अशा शब्दांत भाजपा प्रदेशाध्यक्षचंद्रकांत पाटील यांनी एमएसआरडीसीच्या अधिकाऱ्यांना सुनावले.


रिंग रोडमुळे बाधित होणाऱ्या शेतकऱ्यांसोबत घेऊन आज आ. पाटील यांनी एमएसआरडीसीच्या अधिकाऱ्यांसोबत बैठक घेतली. या बैठकीला आ. भीमराव  तापकीर, पुणे शहर भाजपा प्रवक्ते संदीप खर्डेकर, खडकवासला मतदारसंघाचे अध्यक्ष सचिन मोरे, भारत जगताप,बाळासाहेब बराटे,रांजे चे योगेश मांगले, विराज कोंडे, महेश जायकर, कुसगाव चे नानां कोंडे, रहाटवाडे चे राजेंद्र चोरघे, मांडवी चे सरपंच सचिन पायगुडे, बहुलीच्या सरपंच सारिका रायरीकर,सागर दिसले,यासह सिंहगड खोऱ्यातील मौजे मुठा, सांगरुण, कातवडी, मौजे वरदाडे, खामगाव मावळ,शिवगंगा खोऱ्यातील खोपी, कांजले, केलवडे व भोर येथील अल्पभूधारक शेतकरी व पदाधिकारी उपस्थित होते.

बैठकीनंतर पाटील म्हणाले की, देवेंद्र फडणवीस यांच्या सरकारने रिंग रोडचा जो आराखडा तयार केला होता, त्यात शेतकऱ्यांवर कोणत्याही प्रकारे अन्याय होत नव्हता. मात्र, महाविकास आघाडी सरकारने काही जणांचे हित डोळ्यासमोर ठेवून शेतकऱ्यांना देशोधडीला लावण्याचा घाट घातला आहे. अशाप्रकारे जर विकासकामे राबवली जाणार असतील; तर ते आम्हाला अमान्य आहे. त्यामुळे प्रस्तावित आराखडा रद्द करावा. अन्यथा आमचा कडवा विरोध असेल, अशी ठाम भूमिका त्यांनी यावेळी मांडली.

ते पुढे म्हणाले की, विद्यमान सरकार ‘हम करे सो कायदा’ या भूमिकेत वागत आहे. त्यामुळे सातत्याने विकासाभिमुख प्रकल्प तयार करण्याऐवजी, काही जणांचे हितसंबंध जपण्यासाठी काम करत आहे. राज्य सरकारच्या या धोरणामुळे जनता देखील त्रस्त आहे. आगामी काळात जनताच त्यांना त्यांची जागा दाखवून दिल्याशिवाय राहणार नाही असेही ते म्हणाले. शेतकऱ्यांच्या आंदोलनाला आमचा पूर्ण पाठींबा असेल असेही त्यांनी स्पष्ट केले.

Leave a Reply

%d bloggers like this: