fbpx

प्रशासनाने नारायण राणे यांना समज द्यायला हवी होती – चंद्रकांत पाटील

पुणे : प्रत्येकाची वेगळी शैली असते. नारायण राणेंचीही आहे. मी त्या शैलीचं समर्थन करत नाही. पण त्यांच्या बोलण्याची स्टाईल आहे. पण त्यासाठी थेट अटक? अटक करणं कितपत योग्य आहे? तेही एका केंद्रीय मंत्र्यांना? असं चंद्रकांत पाटील यांनी म्हटलं आहे. एखाद्या वक्तव्यावरुन लगेच त्यांना अटक करणे योग्य ठरणार नाही. सरकारने, प्रशासनाने नारायण राणे यांना समज द्यायला हवी होती अस म्हणत थेट अटक करणं योग्य नाही. राज्य सरकारकडे केंद्रीय मंत्र्याला अटक करण्याचे अधिकार नाहीत, असंही ते म्हणाले.

पुढे चंद्रकांत पाटील म्हणाले की, नारायण राणे नारळासारखे आहेत. वरून कठोर आणि आतून मऊ मनाचे. त्यांच्या एका वक्तव्यावरुन थेट अटक? त्यांना अटक केल्यास राज्यात काय पडसाद उमटतील, याचा विचार सरकारने केलाय का? राज्यात कायदा आणि सुव्यवस्था नांदावी ही जबाबदारी लक्षात घेऊन राज्य सरकार निर्णय घेईल, अशी आशा करतो.

महाविकास आघाडी सरकारच्या कार्यकाळात सर्व अधिकारांची पायमल्ली सुरु आहे. केंद्रीय कॅबिनेट मंत्री नारायण राणे यांच्या एका विधानाबद्दल थेट अटक वॉरंट निघणे हा राज्य सरकारने केलेल्या सत्तेचा दुरुपयोग असल्याचंही त्यांनी म्हटलं आहे.

आक्रमक शैलीत उद्धव ठाकरेंनीही भाषणं केली आहेत. दसरा मेळाव्याची भाषणं काढून पाहा. त्यात वादग्रस्त विधानं आहेत. नीलम गोऱ्हे सभापती असूनही राजकीय वक्तव्यं करतात. त्यांना विचारा की, सभापतीपदाचा राजीनामा दिलाय का? त्यामुळे सामंजस्याने मार्ग काढायला हवा, असं माझं मत आहे.

नारायण राणे साहेबांच्या एका वाक्यावरून टोक गाठून त्यांना अटक होईल इतका देशाचा कायदा कमकुवत नाही. राज्यात शिवसेनेचा बालेकिल्ला समजला जाणाऱ्या कोकणात भाजपाचा जनाधार वाढत आहे, या राजकीय भीतीपोटी हे सगळे सुरु आहे. परंतु यामुळे जनआशीर्वाद यात्रा रद्द होणार नाही, अशी माहिती चंद्रकांत पाटील यांनी दिली.

Leave a Reply

%d bloggers like this: