fbpx

स्वातंत्र्याच्या ७५ वर्षानंतरही देश विकसनशीलच- ब्रिगेडियर प्रसाद जोशी (निवृत्त)

पुणे : एखाद्या देशाला स्वातंत्र्य मिळून ७५ वर्षे होतात, तरीही त्या देशाला विकसनशील देश म्हटले जाते हे न पटण्यासारखे आहे.  आपल्या देशानंतर जन्माला आलेले व्हिएतनाम, सिंगापूर हे देश पुढे गेले आहेत. सुमारे १३२ कोटी लोकसंख्या असलेल्या आपल्या देशात मानवी संसाधनांची कुठेही कमतरता नाही. तरीही आपण एवढे मागे का? या प्रश्नाचे उत्तर आपण सगळ्यांनी शोधायला हवे, असे मत ब्रिगेडियर प्रसाद जोशी (निवृत्त) यांनी व्यक्त केले.

 न-हे येथील जाधवर ग्रुप आॅफ इस्टिस्टयूटस् आणि प्राचार्य डॉ.सुधाकरराव जाधवर सोशल ट्रस्टतर्फे शौर्य पुरस्कार प्रदान सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी ते बोलत होते. समाजात कोविडच्या काळात स्वत:च्या व कुटुंबाच्या आरोग्याची पर्वा न करता शौर्य गाजवित अचंबित करणारी कामगिरी करणा-या पुण्यातील डॉ.प्रदीप डिकोस्टा, मल्लिका अय्यर व अमोल पांगारे यांना यंदाचा शौर्य पुरस्कार प्रदान करण्यात आला. यावेळी संस्थेचे अध्यक्ष प्राचार्य डॉ.सुधाकरराव जाधवर, उपाध्यक्ष अ‍ॅड.शार्दुल जाधवर उपस्थित होते. शाल, श्रीफळ, शिंदेशाही पगडी व सन्मानचिन्ह असे पुरस्काराचे स्वरुप होते. पुरस्कारवितरण सोहळ्याचे यंदा तिसरे वर्ष होते.

ब्रिगेडियर प्रसाद जोशी म्हणाले, आपले सशस्र सेना दल आरक्षणापासून मुक्त आहे. सशस्त्र दलांमध्ये केवळ शारीरिक तंदुरूस्ती, किमान शिक्षण आणि वय  यावर निवड केली जाते. भारतीय सेनेत कुठेही जात पात पाळली जात नाही. आरक्षण दिले जात नाही. तरीही सेनादल चांगले काम करते. मग सरकारी नोकरीमध्ये  सर्व निकष लावूनही आपण  का मागे राहतो. असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला.

अ‍ॅड. शार्दुल जाधवर म्हणाले, यंदाचा शौर्य पुरस्कार केईएम रुग्णालयातील डॉ.प्रदीप डिकोस्टा यांना देण्यात आला. अतिदक्षता विभागातील व्यवस्थापन या विषयाची विशेष आवड असणा-या डॉ. डिकोस्टा यांनी आपल्या वीस वर्षांहून अधिक काळाच्या अनुभवाने या क्षेत्रात महत्त्वाचा ठसा उमटविला आहे. दुस-या पुरस्कारार्थी केईएम हॉस्पिटलमधील वैद्यकीय क्षेत्रात समाजकार्याचा वेगळा ठसा उमटविणा-या सुंदरी उर्फ मल्लिका अय्यर. गेल्या ३१ वर्षांपासून त्या केईएम रूग्णालयात नोकरी करत आहेत.

 तर, तिसरे पुरस्कारार्थी पुणे जिल्ह्यातील भोर तालुक्यातील पंचायत समितीचे माजी उपसभापती अमोल पांगारे. कोरोनाकाळात वेळू गाव तसेच पंचक्रोशी परिसरात कोविड रुग्णांना तातडीने वैद्यकीय सेवा मिळण्यासाठी अमोल पांगारे तत्पर राहिले. त्यामुळे त्यांच्या शौर्याबद्दल त्यांना गौरविण्यात आले.

Leave a Reply

%d bloggers like this: