जागतिक पर्यावरणात मानवजात भयभीत झालेली आहे – डाॅ.श्रीपाल सबनीस

पुणेः- हिटलर मेला आहे ही अफवा असून हिटलर वृत्ती आज ही सभोवताली दिसून येते. हुकुमशाही वृत्तीचे लांगूनचालन करुन वैज्ञानिकांनी उघडलेली अणूची कोठारे समुळ मनुष्य जातीच्या आस्तित्वावर प्रश्नचिन्ह उपस्थित करीत आहे, असे मत अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे माजी अध्यक्ष डाॅ.श्रीपाल सबनीस यांनी व्यक्त केले.

संस्कृती प्रकाशनातर्फे प्रकाशित आणि वि.दा.पिंगळे लिखीत संस्काराच्या पारंब्या या पुस्तकाचे डाॅ.श्रीपाल सबनीस यांच्या हस्ते प्रकाशन झाले त्यावेळी ते बोलत होते. ओंकार चॅरिटेबल ट्रस्टतर्फे या पुस्तक प्रकाशन समारंभाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी साहित्यीक कलावंत प्रतिष्ठानचे अध्यक्ष दिलीप बराटे, नगरसेविका लक्ष्मी दुधाने, ओंकार चॅरिटेबल ट्रस्टचे अध्यक्ष स्वप्निल दुधाने,
ग्रामीण कथाकार बबन पोतदार आदी मान्यवर उपस्थित होते.

डाॅ.श्रीपाल सबनीस म्हणाले,हुकुमशाहीचा वसा घेऊन वावरणारे राष्ट्राध्यक्ष हे केवळ भारताच्या 135 कोटी लोकांच्या जीवावर उठलेले नसून संपूर्ण जगातील 700 कोटी लोकांच्या जीवावर उठले आहेत. संत, विचारवंत यांची कास धरायची सोडून वैज्ञानिकांनी हिटलर प्रवृत्तीची तळी उचलण्याचे पाप केले आहे. संत आणि महापुरषांचे मापदंड समाजासमोर ठेवणे आवश्यक आहे.. समाजात अधिकत्तर खूप वाईट वृत्ती आहेत. भवताल प्रचंड अश्लील, असभ्य, क्रुर आणि हिंसक झालेला आहे. असे असले तरी आपणांस ह्यातूनच मार्ग काढत पुढे जायचे आहे.

दिलीप बराटे म्हणाले, जाती-जातीच्या भिंती ढासळण्या एेवजी त्या अधीक उंच आणि मजबूत होत चालल्या आहेत. जाती जातींं मध्ये आरक्षणा सारख्या मुद्यावरून संघर्ष पेटत आहे. खरे तर आर्थिक निकषांच्या आधारेच आगामी काळात आरक्षणाचे धोरण आखले पाहिजे. व्यक्ति व्यक्तितीत प्रेम, वात्सल्य, आपुलकी, जिव्हाळा भावना जागृत होण्यासाठी लहान मुलांवर संस्कार करणा-या अशा संस्कारांच्या पारंब्यांची आवश्यकता आहे.

लेखकीय मनोगत व्यक्त करतांना लेखक वि.दा. पिंगळे म्हणाले, वडाचे झाड हे भारतीय संस्कृतीचे प्रतीक आहे. वडाच्या झाडाच्या पारंब्या ज्या पद्धतीने मातीत रुजून तिथूनच पुढील वडाचे झाड तयार होते अाणि हे निसर्गचक्र अव्यात सुरु असते, त्याच पद्धतीने संस्काराच्या पारंब्या मना मनात रुजणे आवश्यक आहे. ह्या पारब्यांच्याच माध्यामातून पुढील सुसंस्कारीत पिढी घडेल आणि होणार अनर्थ टाळू शकेल.

ओंकार चॅरिटेबल ट्रस्टचे अध्यक्ष स्वप्निल दुधाने यांनी कार्यक्रमाचे प्रास्तिविक केले तर देवेन्द सुर्यंवंशी यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले. लक्ष्मी दुधाने यांनी आभार मानले.

Leave a Reply

%d bloggers like this: