वीरमातेसोबत गणेशोत्सव कार्यकर्त्यांची राखीपौर्णिमा साजरी

पुणे : देशरक्षणासाठी कार्यरत असलेल्या सेनाधिका-यांची वीरमाता आणि मातृभूमीला वंदन करण्यासाठी देशभर सायकल भ्रमंती करणारी ज्येष्ठ भगिनी, यांनी गणेशोत्सवासह वर्षभरात कोणत्याही क्षणी समाजावर येणा-या संकटांना तोंड देत सेवाकार्यात रमलेल्या गणेशोत्सव कार्यकर्त्यांसमवेत रक्षाबंधन साजरे केले. भारत माता की जय… च्या जयघोषात व पुण्यातील सेवाकार्यात आघाडीवर असलेल्या गणेशोत्सव कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत हा सोहळा उत्साहात पार पडला.

सैनिक मित्र परिवार व सेवा मित्र मंडळ ट्रस्टतर्फे शुक्रवार पेठेतील सेवा मित्र मंडळ चौकात गणेश मंदिरासमोर राखीपौर्णिमा – राष्ट्रभक्तीचा रेशीमधागा या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. सरहद््दीवर कार्यरत असलेल्या कर्नल निलेश पाथरकर यांच्या वीरमाता वृंदा पाथरकर आणि काश्मिर ते कन्याकुमारी सायकलप्रवास करणा-या निरुपमा भावे यांनी कार्यकर्त्यांना औक्षण करीत राखी बांधली.

यावेळी आनंद सराफ, शिरीष मोहिते, पराग ठाकूर, सुनील पांडे, शाहीर हेमंत मावळे, नारायण राऊत, उदय जगताप, नितीन पंडित, गिरीष पोटफोडे, विष्णू ठाकूर, पीयुष शाह, मंदार रांजेकर, दिनेश अंबुरे, विक्रांत मोहिते, उमेश सकपाळ, अमर लांडे, उमेश कांबळे, देविदास चव्हाण, राजेश भोर आदी उपस्थित होते.

वृंदा पाथरकर म्हणाल्या, गणेशोत्सव कार्यकर्त्यांमधील तरुणाई अत्यंत उत्साहाने सामाजिक कार्यात सहभागी होत आहे. समाजात असे काम करण्याकरीता सर्व कार्यकर्त्यांचे आरोग्य उत्तम राहो, अशी प्रार्थना आपण गणरायाचरणी करुया, असेही त्यांनी सांगितले.

आनंद सराफ म्हणाले, राखीपौर्णिमेच्या माध्यमातून सैनिकांना व त्यांच्या कुटुंबियांना आनंद व उर्जा मिळावी, याकरीता आम्ही उपक्रमाचे आयोजन करतो. सिमेवर लढणा-या सैनिकांचे अनेक कुटुंबिय पुण्यामध्ये राहतात, त्यामुळे सण-उत्सवांच्या माध्यमातून सैनिकांच्या कुटुंबियांमध्ये आणि गणेशोत्सव कार्यकर्त्यांमध्ये संवाद घडवून आणण्याचे काम यामाध्यमातून होत असल्याचे त्यांनी सांगितले. कल्याणी सराफ, वंदना मोहिते यांनी देखील मान्यवरांसोबत कार्यकर्त्यांना औक्षण केले.

Leave a Reply

%d bloggers like this: