काहीही झाल तरी मुंबई महापालिका जिंकणारच – केंद्रीय मंत्री नारायण राणे
मुंबई : मुंबई महापालिका जिंकणे हीच जबाबदारी पक्षाने माझ्याकडे दिली आहे. त्यामुळे काहीही झाले तरीही मुंबई महापालिका जिंकणारच, असा विश्वास केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी यांनी आज व्यक्त केला आहे.
केंद्रीय मंत्री झाल्यानंतर नारायण राणे आज पहिल्यांदाच मुंबईत दाखल झाले. आज बाळासाहेब ठाकरे स्मारकापासून त्यांच्या जन आशीर्वाद यात्रेला सुरूवात झाली. यावेळी त्यांच्या सोबत विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, प्रवीण दरेकर यांसह अनेक भाजप कार्यकर्ते होते.
राणे यावेळी म्हणाले, येत्या महापालिका निवडणुकीत पापाचा ३२ वर्षांचा घडा फुटल्याशिवाय राहणार नाही. मुंबई महापालिका जिंकणे हीच जबाबदारी पक्षाने माझ्याकडे दिली आहे. त्यामुळे काहीही झाले तरीही मुंबई महापालिका जिंकणारच. मुंबई महापालिकेसाठी देवेंद्र फडणवीस, प्रवीण दरेकर या साऱ्यांकडेच जबाबदारी देण्यात आली आहे. तशी माझ्याकडेही जबाबदारी देण्यात आली आहे, असेही त्यांनी स्पष्ट केले. आता कोरोनाचे नियम सांगून उगाच उपदेशाची भाषा करू नये. फारच थोडे दिवस राहिलेत असेही राणे यांनी स्पष्ट केले.
बाळासाहेबांची पदोपदी आठवण
मी आज जे काही आहे ते बाळासाहेबांमुळेच. त्यांची आठवण पदोपदी येते. आज बाळासाहेब असते तर म्हणाले असते की, नारायण…अशीच करत रहा. आज बाळासाहेब नसले तरीही त्यांचा आशीर्वाद माझ्या डोक्यावर आहेत; अशा शब्दांत नारायण राणे यांनी आपल्या बाळासाहेब ठाकरे यांच्या विषयीच्या भावना आज व्यक्त केला. दरम्यान, राणे यांच्या बाळासाहेब ठाकरे स्मारकाला भेट देण्याला शिवसेनेकडून विरोध दर्शविला जात होता. त्याला उत्तर देत राणे म्हणाले, बाळासाहेब हे सर्वांचे आहे. तसेच स्मारक हे पालिकेने बांधलेले आहे. त्यामुळेच कोणत्याही व्यक्तीचे स्मारक असो विरोधाची भाषा नको, त्या भावनेचा आदर करायला हवा असेही राणे म्हणाले. ज्यांना विरोधात बोलायचे आहे त्यांनी स्वतः बोलाव, उजव्या डाव्यांना बोलायला लावू नये. आम्ही त्यांनाही थेट उत्तर देऊ.
