न्यायालयीन चौकशी पूर्ण झाल्याशिवाय मी चौकशीला जाणार नाही – अनिल देशमुख
मुंबई : राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांना आर्थिक गैरव्यवहार प्रकरणी सक्तवसुली संचालनालय म्हणजेच ईडीने (ED) आतापर्यंत पाच वेळा समन्स बजावलं आहे. मात्र, एकदाही अनिल देशमुख चौकशीसाठी ईडीसमोर हजर झालेले नाहीत. अनिल देशमुख चौकशीसाठी का हजर होत नाहीत? याविषयी चर्चा सुरु असताना आता अनिल देशमुख यांनी स्पष्टीकरण दिलं आहे. न्यायालयीन चौकशी पूर्ण झाल्याशिवाय मी चौकशीला जाणार नाही अशी स्पष्ट भूमिका अनिल देशमुख यांनी मांडली आहे.
अनिल देशमुख यांनी एक प्रसिद्धी पत्रक जारी केलं आहे. यामध्ये त्यांनी त्यांची भूमिका स्पष्ट केली आहे. “माझी ED च्या बाबतीतली याचिका सर्वोच्च न्यायालयाने स्विकृत केली आहे. सर्वोच्च न्यायालय ही याचिका लवकरच ऐकूण घेणार आहे. त्याचबरोबर सर्वोच्च न्यायालयाने मला खालच्या न्यायालयामध्ये जाण्याची मुभा दिली आहे. त्यामुळे आता ही न्यायालयीन प्रक्रिया सुरु आहे. ही न्यायालयीन प्रक्रिया पूर्ण झाल्यावर मी स्वत: ED च्या समोर जाणार आहे व त्यांना संपूर्ण सहकार्य करणार आहे. माझ्या संपूर्ण राजकीय-सामाजिक जीवनात मी सदैव उच्च आदर्शांचे पालन केलं आहे,” असं देशमुख यांनी त्यांच्या प्रसिद्धी पत्रकात म्हटलं आहे.
