आगामी काळात आर्थिकदृष्ट्या दुर्बलांचे उत्त्पन्न वाढवण्यावर भर देण्याची गरज -चंद्रकांत पाटील
पुणे : कोरोनाच्या काळात आर्थिकदृष्ट्या दुर्बल कुटुंबांना मोठ्या संकटाचा सामना करावा लागला. मध्यवर्गीयांना त्यांनी केलेली बचत कोरोना काळात कामी आली. मात्र, आर्थिकदृष्ट्या दुर्बलांना अनेक अडचणींचा सामना करावा लागला. त्यामुळे आगामी काळात त्यांचे उत्त्पन्न वाढीसाठी प्रयत्न केल्यास, हा वर्ग देखील बचत करु शकेल, असे प्रतिपादन भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी केले.
कोरोना आणि लॉकडॉऊनमुळे बेरोजगारीची कुऱ्हाड कोसळलेल्यांसाठी चंद्रकांत पाटील यांच्या पुढाकारातून आणि पुणे शहर उद्योग आघाडीच्या माध्यमातून ‘एक हात मदतीचा’ उपक्रम राबवण्यात आला. या उपक्रमाअंतर्गत अनेकांना एक महिन्याचा रोजगाराची संधी उपलब्ध करुन देण्यात आली होती. त्या सर्वांचे मानधन आणि एक महिन्याचे शिधावाटप पाटील यांच्या जनसंपर्क कार्यालयात करण्यात आले. यानिमित्त आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते.
या कार्यक्रम प्रसंगी महापौर मुरलीधर मोहोळ, उद्योग आघाडी अध्यक्षा अमृता देवगांवकर, उपाध्यक्ष संतोष परदेशी, सरचिटणीस रामदास गावडे, कोथरूड मतदार संघ अध्यक्ष पुनीत जोशी, पुणे शहर भाजपा प्रवक्ते संदीप खर्डेकर, मंदार देवगांवकर आदी मान्यवरांच्या बरोबर पदाधिकारी व लाभार्थी उपस्थित होते.
पाटील म्हणाले की, “आपल्या देशातील फार मोठा वर्ग आर्थिकदृष्ट्या दुर्बल आहे. कोरोना आणि लॉकडाऊनमुळे त्यांची आर्थिक परिस्थिती प्रचंड खालावली. मध्यवर्गीयांना त्यांनी केलेल्या बचतीचा कोरोनाच्या काळात आधार मिळाला. मात्र आर्थिकदृष्ट्या दुर्बलांना अनेक अडचणींचा सामना करावा लागला. त्यामुळे आगामी काळात आर्थिकदृष्ट्या दुर्बलांचे उत्त्पन्न वाढविण्यासाठी प्रयत्न करण्याची गरज आहे. जेणेकरुन त्यांना देखील बचत करणे सोपे होईल.”
ते पुढे म्हणाले की, “आगामी काळात गणेशोत्सव, दसरा, दिवाळी सारखे सण-समारंभ आहेत. त्यामुळे महिलांनी पुढाकार घेऊन याचा फायदा घेऊन व्यवसाय सुरु केले पाहिजे. यासाठी सर्वतोपरी सहकार्य करु,” असे आश्वासन ही त्यांनी यावेळी दिले.
महापौर मुरलीधर मोहोळ म्हणाले की, “कोरोनाच्या काळात भारतीय जनता पक्षाच्या माध्यमातून अनेक समाजोपयोगी सेवा उपक्रम राबविण्यात आले. या प्रत्येक उपक्रमात माननीय दादांनी पुढाकार घेऊन एक आदर्श निर्माण केला. त्यांच्या कामाचा आदर्श घेऊनच राज्यातील लोकप्रतिनिधींनी अनेक सेवा उपक्रम राबविले. या उपक्रमातून समाजाला उभे करण्याचं काम भारतीय जनता पक्षाने केले.”
