fbpx
Thursday, April 25, 2024
Latest NewsMAHARASHTRATOP NEWS

अनिल देशमुख पाचव्यांदा ED चौकशीला गैरहजर

मुंबई : १०० कोटी रुपयांच्या खंडणीच्या आरोपांमुळे ईडीच्या भोवऱ्यात सापडलेले राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख हे आज पाचव्यांदा ईडीच्या चौकशीला गैरहजर राहिले. त्यांनी ईडीच्या समन्सला आपल्या वकीलांमार्फत उत्तर दिले. अनिल देशमुखांना ईडीसमोर हजर राहता येणार नसल्याचा अर्ज दाखल करण्यासाठी त्यांचे वकिल इंदरपाल सिंग हे आज ईडीच्या कार्यालयात आले होते. ‘आम्ही ईडीला काही काळ वाट पाहण्यास सांगितले आहे. सर्वोच्च न्यायालयाने आमची याचिका दाखल करून घेतली आहे. सर्वोच्च न्यायालयाचा निकाल येईपर्यंत थांबावे, अशी भूमिका मांडणारे पत्र आम्ही ईडीला दिले आहे. तपासात आम्ही पूर्ण सहकार्य करत आहोत’, अशी माहिती इंदरपाल सिंग यांनी माध्यमांशी बोलताना दिली.

तसेच ‘सर्वोच्च न्यायालयात सुनावणीसाठी याचिका दाखल करून घेतलेली असतानाच ईडीकडून वारंवार अनिल देशमुख यांना समन्स पाठवण्यात का येत आहेत हेच कळत नाही’, असा सवालही यावेळी इंदरपाल सिंग यांनी उपस्थित केला. तसेच ‘ही प्रकरणे सर्वोच्च न्यायालयात असल्याने अटकपूर्व जामीनासाठी अर्ज करण्याचा प्रश्नच येत नाही’, असेही ते म्हणाले. त्याचबरोबर ‘सर्वोच्च न्यायालयाचा निकाल आल्यानंतर आम्ही चौकशीसाठी हजर राहू’, असेही इंदरपाल सिंग यांनी स्पष्ट केले.

दरम्यान, ईडीला पैशांच्या अपहाराच्या प्रकरणात अनिल देशमुखांचा जबाब नोंदवून घ्यायचा आहे. त्यासाठी ईडीने त्यांना प्रिव्हेन्शन ऑफ मनी लॉड्रिंग ऍक्टअंतर्गत पाचव्यांदा समन्स बजावला. मात्र देशमुखांनी आतापर्यंत अनेकदा ईडीच्या समन्सला कोणताही प्रतिसाद न देता गैरहजेरी लावली आहे. त्यांच्यासोबत त्यांची पत्नी आणि मुलगा ऋषीकेश यांनाही ईडीने समन्स बजावला आहे, मात्र हे दोघेही ईडीसमोर हजर राहिलेले नाहीत. त्याउलट ईडीमार्फतच्या कारवाईवर अनिल देशमुख यांनी प्रश्नचिन्ह उपस्थित करत ही अन्यायकारक अशी कारवाई असल्याचेही म्हटले आहे. जुलै महिन्यात व्हिडिओ स्टेटमेंट नोंदवतानाच त्यांनी सांगितले होते की, सर्वोच्च न्यायालयात हे प्रकरण न्यायप्रविष्ठ असून सर्वोच्च न्यायालयाचा निकाल आल्यानंतरच मी ईडीसमोर हजर होईन.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading