Friday, September 25, 2026
Latest NewsPUNE

बाबासाहेब पुरंदरे यांना १०० शिवकथेच्या व्याख्यानांनी मानवंदना 

पुणे : पद्मविभूषण शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे जन्मशताब्दी गौरव समिती व शुक्रवार पेठेतील सेवा मित्र मंडळ ट्रस्टच्या सहकार्याने पद्मविभूषण शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांच्या जन्मशताब्दीनिमित्त गौरव शिवशाहिरांच्या शिवशतकाचा या अनोख्या उपक्रमाचा प्रारंभ झाला. त्यातील पहिले व्याख्यान शिवव्याख्याते व लेखक सौरभ कर्डे यांनी सेवा मित्र मंडळ येथे केले. बाबासाहेबांना महाराष्ट्रात ही अशी आगळीवेगळी व्याख्यानांची मानवंदना पुण्यामध्ये दिली जात आहे.

कार्यक्रमाला राष्ट्रीय कीर्तनकार ह.भ.प.चारुदत्त आफळे, शिक्षण प्रसारक मंडळीचे पराग ठाकूर, शुभांगी आफळे, विनायक घाटे, डॉ. रवींद्र लोहकरे, विवेक खटावकर, शिरीष मोहिते आदी उपस्थित होते.

सौरभ कर्डे म्हणाले, मातेची शिकवण व वडिलांचा संस्कार याला बांधिल राहून नवा इतिहास मराठी मातीत निर्माण केला तो शिवरायांनी. शिवरायांशी मराठी माणसाच्या पिढया आजही जोडलेल्या आहेत. आपण शिवकार्य केले तर शिवरायांचा आशिर्वाद कायम आपल्यासोबत असतो. कोविडचा काळ हा प्रतिकूल काळ आहे, त्यामुळे धीर धरा, हा पवित्रा आपण घ्यायला हवा. शिवरायांच्या काळात अनेक संकटे आले. त्यांनी संकटे परतवून लावली. त्यामुळे आज आलेल्या संकटांना आपण धीराने सामोरे जायला हवे.

शिरीष मोहिते म्हणाले, पद्मविभूषण शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे जन्मशताब्दी गौरव समितीतर्फे पुढील वर्षभरात शिवशाहिरांना १०० शिवकथेच्या व्याख्यानांनी मानवंदना देण्यात येणार आहे. महाराष्ट्रात विविध ठिकाणी हा उपक्रम राबविण्यात येणार आहे. पुढील वर्षी शेवटचे व्याख्यान नागपंचमीला सेवा मित्र मंडळ येथेच होईल. शिवरायांचे बालपण, तरुणपण, राजकीय कारकिर्द, विविध पैलू व्याख्यानातून अनुभवायला मिळणार आहेत, असेही ते म्हणाले.
मंडळाचे अध्यक्ष रवींद्र बरिदे, उमेश कांबळे, अमेय थोपटे, विक्रांत मोहिते, अमर लांडे, अ‍ॅड.हेमंत झंझाड, रोहन जाधव, अजय पंडित यांनी आयोजन केले. वैभव वाघ यांनी सूत्रसंचालन केले.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading