Wednesday, November 18, 2026
Latest NewsMAHARASHTRAPUNETOP NEWS

इतिहास समजेल, रुचेल आणि आवडेल अशा पद्धतीने पुरंदरे यांनी सांगितला – राज ठाकरे

पुणे : शिवाजी महाराजांची गोडी वडीलांमुळे लागली. अनेक मित्रांच्या साथीने ती वाढली आणि ती जोपासली. वेड लागल्याशिवाय इतिहास कळत नाही. मलाही शिवाजी महाराजांचे वेड लागले. सहजगत्या हे सगळे झाले. मी पुजारी किंवा गुरव नाही. त्यांची बुद्धिमत्ता, पराक्रम, कार्य मला भुरळ घालते. मी भारावून जातो. त्यांची राष्ट्रनिर्मिती, स्वराज्य निर्मितीची भावना खूप मोलाची आहे. हे राज्य आमचे आहे येथे तुम्हाला भलतेसलते काही करू देणार नाही, असे त्यांनी बजावले, असे उद्गार काढतानाच लोकांचे मिळणारे प्रेम पाहून पुन्हा इथेच जन्म घ्यावा, असे वाटते, असे उद्गार शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांनी आज येथे काढले.

शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांच्या शतकमहोत्सवी वर्षाची सुरुवात झाली असून जीवनगाणी, जयसत्य चॅरिटेबल ट्रस्ट आणि स्वरगंधार या संस्थांनी संयुक्त विद्यमाने  पुरंदरे यांचा भव्य सत्कार आयोजित करण्यात आला.  पार्श्वगायिका आशा भोसले यांच्या हस्ते आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे, ज्येष्ठ इतिहासकार गजानन मेहेंदळे,आमदार  आशिष शेलार यांच्या प्रमुख उपस्थितीत हा सोहळा पार पडला. या सत्कार सोहोळ्याला उत्तर देताना पुरंदरे बोलत होते.

 ते पुढे म्हणाले, “जगात केवळ पाच किंवा सहाच लोकांना मी ‘अरेतुरे’ करतो, त्यात आशा भोसले आहेत. मंगेशकर कुटुंबातील सगळी भावंडे मला प्रिय आहेत. लतादीदीनी एकदा विचारले, तुम्हाला कोणाचा आवाज आवडतो तेव्हा पंचाईत झाली मग सांगितले कपबश्यांचा आवाज आवडतो. त्यांच्याबरोबर जिव्हाळ्याचे नाते होते. मनाचे औदार्य असणारे मंगेशकर कुटुंब आहे. ते कुटुंब म्हणजे एक संस्कृती, विचार आहे. दीनानाथ मंगेशकर यांच्यापासून आमची ओळख आहे. ७५ वर्षांचा त्यांचा माझा स्नेह आहे.”

आशा भोसले म्हणाल्या, “सर्वार्थाने महान असलेली आणि पाया पडण्यासारखी एकच व्यक्ती इथे आहे, ती म्हणजे बाबासाहेब पुरंदरे. मी भाषण देणारी नाही, फार शिकलेली नाही, अनेक लेखकांच्या लेखनामुळे मला बोलता येते. पुस्तक वाचन केले. वाचनवेड होते. लेखकांची आवड होती. कोल्हापुरात बाबासाहेबांची माझी भेट झाली. त्यांचा पुढे पाहुणचार करण्याची संधी मिळाली. गोनी दांडेकर, बाबासाहेब, दत्ता ढवळे यांच्यासारखी माणसे माझ्या घरी यायची, हे माझे नशीब होते. बाबासाहेबांनी अनेक गडकिल्ले सर केले त्याचे वर्णन त्यांनी मला ऐकवले. मनाची ताकद असल्याने त्यांनी हे शिवधनुष्य पेलले गेले.”

राज ठाकरे म्हणाले, “इतिहास समजेल, रुचेल आणि आवडेल अशा पद्धतीने त्यांनी इतिहास सांगितला. व्याख्यानात, भाषणात इतिहास कधीच सोडला नाही. दंतकथांना वाव नाही. इतिहास सांगताना अलंकारिक, सोप्या भाषेचा वापर केल्याने त्याला लोकप्रियता मिळाली. शिवचरित्र अनेकांनी लिहिले पण बाबासाहेबांनी ते घराघरात, मनामनात पोहोचवले. महाराष्ट्रात देशात आणि जगभरातही त्यांचे शिवचरित्र गेले आहे. त्यांनी पोवाडा म्हटला नसला तरी ते शिवशाहीर आहेत. इतिहास संशोधक आहेत. इतिहास सहज समजावा यासाठी त्यांनी कार्य केले. यापुढेही हे कार्य पुढे चालू राहील,” असेही राज ठाकरे आपल्या भाषणात पुढे म्हणाले.

 

Leave a Reply