Sunday, September 27, 2026
Latest NewsMAHARASHTRAPUNETOP NEWS

रानडे इन्स्टिट्यूटमधील पत्रकारीता विभागाचे स्थलांतर होणार नाही – उदय सामंत

पुणे :  रानडे इन्स्टिट्यूट मधील ‘संज्ञापन व वृत्तपत्र विद्या विभाग’ हा सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात स्थलांतरीत  होणार नाही. या जागेचा वाद न्यायाप्रविष्ट आहे. त्यामुळे सदर जागेचे व्यावसायिकरण होणे शक्य नाही. गरज भासल्यास सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाला महाराष्ट्र सरकार सहकार्य करायला तयार आहे, असे राज्याचे उच्च तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांनी शनिवारी पत्रकार परिषदेत सांगितले. 

रानडे इन्स्टिट्यूटमधील सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात स्थलांतरीत करून एफ सी रोड वरील ही मोक्याची जागा विल्डरांच्या घशात घातली जात असल्याचा वाद गेल्या काही दिवसांपासून सुरू होता. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचा हा वादग्रस्त निर्णय आज सामंत यांनी रद्द केल्याचे सांगत या वादावर पडदा टाकला आहे. या संदर्भात आज सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. नितीन करमळकर, संज्ञापन व वृत्तपत्र विद्या विभाग प्रमुख उज्वला बर्वे यांच्याशी सामंत यांनी चर्चा केली. त्यानंतर आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते.   

उदय सामंत म्हणाले, रानडे इन्स्टिट्यूटची जागा सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाकडे भाडेतत्त्वावर आहे. ही जागा विद्यापीठाच्या नावावर किंवा विद्यापीठाच्या मालकीची होण्यासाठी पुढील काळात प्रयत्न केले जाणार आहेत. तसेच रानडे इन्स्टिट्यूटच्या टेक्निकल अपग्रेडेशनसाठी स्टुडिओ आणि इतर सुविधांसाठी देखील कुलगुरुंसोबत चर्चा झाली. त्यासाठी शेजारच्या इमारतीत सोय करता येईल. 

रानडे इन्स्टिट्यूटमधे काळानुरूप जे बदल करायचे आहेत यासाठी उच्च शिक्षण विभागाचे प्रधान सचिव यांची एक सदस्यीय समिती नेमण्यात आली आहे. ही समिती तीन महिन्यांमध्ये अहवाल देईल. त्या अहवाला नंतर रानडे इन्स्टिट्यूटसाठी ज्या गोष्टी करायच्या आहेत त्या केल्या जातील, असे देखील उदय सामंत या वेळी म्हणाले.

रानडे इन्स्टिट्यूटमध्ये शैक्षणिक गुणवत्ता वाढ आणि परिसर सुधारणा होणे गरजेचे आहे, अशी विनंती पुणे श्रमिक पत्रकार संघाचे अध्यक्ष मंगेश कोळपकर, सरचिटणीस डॉ. सुजीत तांबडे, उपाध्यक्ष सुदीप डांगे, चिटणीस प्रसाद पाठक, सदस्य प्रशांत चव्हाण, प्रसाद जगताप, गणेश वाघमोडे आदींनी केली.  पुणे पत्रकार प्रतिष्टानचे अध्यक्ष जितेंद्र अष्टेकर, विश्वस्त प्रकाश भोईटे, शैलेश काळे यांनीही उपस्थित राहून चर्चेत भाग घेतला. 

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading