Saturday, September 26, 2026
Latest NewsPUNE

संसर्ग रोखण्यासाठी कोरोना प्रतिबंधात्मक नियमांचे काटेकोरपणे पालन करा – उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे निर्देश

बारामती :-   शहरासह तालुक्यात कोरोना संसर्गाचा दर पाच टक्क्यांच्या पुढे गेल्यास नाईलाजाने पुन्हा कडक निर्बंध लावावे लागतील, त्यामुळे सर्वांनीच खबरदारी घेणे आवश्यक आहे. कोरोना संसर्ग रोखण्यासाठी कोरोना प्रतिबंधात्मक नियमांचे काटेकोरपणे पालन करण्याच्या सूचना उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज दिल्या. तसेच बारामती तालुक्यात सुरु असणारी विकास कामे दर्जेदार करण्याबरोबरच सर्व विभागांनी समन्वय राखत वेळेत पूर्ण करण्याचे निर्देश त्यांनी दिले.

बारामती परिसरातील विकासकामांच्या पाहणी दौऱ्यानंतर येथील विद्या प्रतिष्ठानच्या सभागृहात कोविड -19 विषाणू प्रादुर्भावाची परिस्थिती आणि उपाययोजनांचा आढावा उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी घेतला. त्यावेळी ते बोलत होते.

उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले की,  टाक्स फोर्सने सप्टेंबर महिन्यात तिसरी लाट येण्याची  शक्यता वर्तवली आहे, त्यादृष्टीने सर्व नियोजन सुरु आहे. उपलब्ध ऑक्सिजनची आवश्यकता वाढण्याची शक्यता गृहित धरुन ऑक्सिजनचा साठा करुन ठेवणे आवश्यक आहे. ज्यांनी लसीकरणाचे दोन डोस घेतले आहेत त्यांनाच  मॉलमध्ये प्रवेश देणे बंधनकारक करा.  लसीकरणांचे नियोजन व्यवस्थित करावे. पहिला डोस घेतलेल्यांनाच प्रथम प्राधान्य द्या. बारामतीमध्ये एमआयडीसीमधील कंपन्यांनी तसेच व्यापारी वर्गाने कोरोना नियमांचे काटेकोर पालन करणे आवश्यक आहे. सर्व रुग्णालयात ऑक्सिजन बेड्सची व्यवस्था सुनिश्चित कराव्यात अशा सूचना त्यंनी दिल्या. तसेच कोरोनाचा प्रादुर्भाव आटोक्यात आणण्यासाठी प्रत्येक नागरिकाने खबरदारी घेणे गरजेचे आहे. काही नागरिक मास्क वापरताना दिसत नाहीत तरी नागरिकांनी मास्क वापरावा, सार्वजनिक ठिकाणी गर्दी होणार नाही याबाबतची दक्षता घ्यावी, असे आवाहनही त्यांनी यावेळी केले.

या बैठकीपूर्वी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी कऱ्हा नदी सुधार प्रकल्प, ख्रिश्चन कॉलनी येथील कॅनलवरील ब्रिजचे काम, परकाळे बंगला येथील कॅनलवरील रोड व सुशोभीकरण, क्रीडा संकुल,  ज्येष्ठ नागरिक संघाची इमारत, बारामती कुस्ती केंद्र व  पंचायत समितीच्या नवीन इमारतीच्या कामाची पाहणी करून संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांना विकासकामांबाबत योग्य त्या सूचना देऊन विकासकामे दर्जेदार आणि वेळेत पूर्ण करावीत अशा सूचना दिल्या.

या बैठकीपूर्वी सांगली  जिल्ह्यातील खिद्रापूर येथील पूरग्रस्तांना अखिल तांदुळवाडी वेस तरुण मंडळ आणि पांडुरंग प्रतिष्ठान गोकुळवाडी व नगरपारिषद सदस्य अनिता गायकवाड यांच्या सहकार्याने दीड लाखांचे जीवनावश्यक वस्तूंचे किट पूरग्रस्तांना पाठविण्यात आले.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading