fbpx
Monday, May 13, 2024
Latest NewsMAHARASHTRAPUNE

पुणे जिल्ह्यातील वक्फ मंडळाकडे नोंदणीकृत असलेल्या संस्थेच्या 7 कोटी 76 लाख रुपयांच्या रकमेचा अपहार केल्याप्रकरणी दोघा जणांविरुद्ध गुन्हा दाखल

मुंबई : महाराष्ट्र राज्य वक्फ मंडळाकडे नोंदणीकृत असलेल्या पुणे जिल्ह्यातील एका ट्रस्टला शासनाकडून जमीन अधिग्रहणाच्या भरपाईपोटी मिळणाऱ्या रकमेचा परस्पर अपहार केल्याप्रकरणी तसेच यासाठी बनावट कागदपत्रे सादर करून शासनाची तसेच वक्फ मंडळाची फसवणूक केल्याप्रकरणी पुण्यातील दोघा जणांविरुद्ध बंडगार्डन पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. वक्फ मंडळाचे पुणे प्रादेशिक वक्फ अधिकारी यांच्या तक्रारीवरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याप्रकरणी इम्तियाज महम्मद हुसेन शेख (रा. रामनगर, येरवडा, पुणे) आणि चांद रमजान मुलाणी (राहणार सदर) यांच्याविरुद्ध भारतीय दंड विधानाच्या विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या दोघांनी आपसात संगनमत करून स्वतःला ताबूत इनाम इंडोमेंट ट्रस्टचे (मौजे माण, ता. मुळशी, जि. पुणे)
अध्यक्ष आणि सचिव असल्याचे भासवून या रकमेचा अपहार केला आहे.

ताबूत इनाम इंडोमेंट ट्रस्ट ही संस्था महाराष्ट्र राज्य वक्फ मंडळकडे नोंदणीकृत आहे. या मंडळाकडील 5 हेक्टर 51 आर क्षेत्राची जमीन एमआयडीसी अधिनियमान्वये राजीव गांधी तंत्रज्ञान टप्पा क्रमांक चारसाठी शासनामार्फत अधिग्रहित करण्यात आली होती. यासाठी 9 कोटी 64 लाख रुपये इतकी निवाडा रक्कम मंजूर झाली होती. परंतु बरेच दिवस ही रक्कम न मिळाल्याने ट्रस्टने वक्फ मंडळाला तसे कळविले. पुणे प्रादेशिक वक्फ कार्यालयाकडून याची दखल घेऊन भूसंपादन उपजिल्हाधिकारी यांचेकडे चौकशी करण्यात आली, त्यावेळी हा प्रकार उघडकीस आला.

इम्तियाज महम्मद हुसेन शेख आणि चांद रमजान मुलाणी या दोघांनी स्वतःला संबंधित ट्रस्टचे अध्यक्ष व सचिव असल्याचे भासवून तसेच वक्फ बोर्डाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी यांचे बनावट नाहरकत पत्र पुणे भूसंपादन उपजिल्हाधिकारी यांच्याकडे सादर केले. त्यानंतर या दोघांनी जमीन अधिग्रहणाच्या भरपाईपोटी मिळालेल्या 7 कोटी 76 लाख 98 हजार रुपये रकमेचा डिमांड ड्राफ्ट ट्रस्टच्या बँक खात्यावर जमा न करता तो वैयक्तिक बँक खात्यावर जमा केला आणि त्या माध्यमातून रकमेचा अपहार केला. तथापि, पुणे प्रादेशिक वक्फ कार्यालयाकडून उपजिल्हाधिकारी, भूसंपादन क्र. 13, पुणे यांच्याकडे याबाबत करण्यात आलेल्या तक्रारीची दखल न घेता उपजिल्हाधिकाऱ्यांकडून वक्फ कार्यालयाचा अर्ज फेटाळण्यात आल्याचेही पोलीस तक्रारीत नमूद करण्यात आले आहे.

ही बाब लक्षात आल्यानंतर पुणे प्रादेशिक वक्फ अधिकारी खुसरो खान यांनी बंडगार्डन पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. त्याची दखल घेत रकमेचा अपहार करणार्‍या शेख आणि मुलाणी या दोन जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

वक्फ नोंदणीकृत संस्थांमधील गैरव्यवहार रोखण्यासाठी कठोर पाऊले उचलणार – मंत्री नवाब मलिक

यासंदर्भात प्रतिक्रिया व्यक्त करताना अल्पसंख्याक विकास आणि औकाफ विभागाचे मंत्री नवाब मलिक म्हणाले की, वक्फ मंडळाकडे नोंदणीकृत असलेल्या ट्रस्ट आणि संस्थांकडून मुस्लिम समाजहिताचे कार्य केले जाते. पण काही अपप्रवृत्तींकडून याचा गैरफायदा घेतला जातो. अशा अपप्रवृत्तींना रोखण्यासाठी तसेच वक्फ मंडळाकडे नोंदणीकृत असलेल्या संस्थांमधील गैरव्यवहार रोखण्यासाठी शासनाकडून कडक पाऊले उचलली जातील. अशा अपप्रवृत्तींविरुद्ध कठोर कारवाई केली जाईल. अशा गैरव्यवहारांचा शोध घेऊन त्याबाबत कठोर कारवाई करण्याच्या सुचना विभागाच्या तसेच वक्फ मंडळाच्या अधिकार्‍यांना देण्यात आल्या असल्याचे त्यांनी सांगितले.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading