fbpx
Thursday, April 25, 2024
Latest NewsPUNE

पुण्यातील रिक्षा स्थानके ही सांस्कृतिक केंद्र- नितीन पवार

पुणे : श्रावण महिन्यात रिक्षा स्थानकांवर पूजा केलेली दिसते. रिक्षा देखील सजविल्या जातात. पूजा करणे हे केवळ निमित्त आहे. त्यानिमित्ताने सर्वांचे स्नेहमिलन होते. लोक एकत्र येतात आणि आपली संस्कृती देखील जपली जाते. संपूर्ण भारतात पुण्यातील रिक्षाचाकांची संस्कृती ही कुठेही दिसत नाही. त्यामुळे पुण्यातील रिक्षा स्थानके ही ख-या अर्थाने सांस्कृतिक केंद्र आहेत, असे मत रिक्षा पंचायत, पुणेचे सरचिटणीस नितीन पवार यांनी व्यक्त केले.

आनंदवन बहुउद्देशीय संस्था पुणे, भाजपा एनजीओ आघाडी आणि छावा  स्वराज्य सेना महाराष्ट्र राज्य यांच्यावतीने रिक्षाचालक व कॅब चालकांसाठी फर्ग्युसन कॉलेज रस्ता येथे विनामूल्य नेत्र तपासणी व चष्मे वाटपाचे आयोजन करण्यात आले. यावेळी आमदार सिद्धार्थ शिरोळे, आनंदवन व्यसनमुक्ती व पुनर्वसन केंद्राचे अध्यक्ष डॉ. अजय दुधाणे, पुणे शहर भाजप रिक्षा आघाडी अध्यक्ष अंकुश नवले, प्रदेशाध्यक्ष राजेंद्र पडवळ, छावा संघटनेचे संस्थापक राम घायतिडक, शितल हुलावळे, शुभम शहा, नयन पुजारी, अनिल ववले, संतोष मोरे, राकेश घरत, एकनाथ पवार, संतोष शिगवण, सतीश गजमल आदी मान्यवर उपस्थित होते. यावेळी एकूण १५० रिक्षाचालक व कॅब चालकांची मोफत तपासणी करण्यात आली. उपक्रमाला व्हिजन स्प्रिंग यांनी सहकार्य केले होते.

नितीन पवार म्हणाले, रिक्षा स्थानकाचे फलक काढण्याचा प्रयत्न झाला होता. त्यावेळी मोठ्या प्रमाणात विरोध केला. कारण लोक तेथे एकत्र येतात. अनेकदा हरविलेल्या वस्तू त्यांनी मिळतात. अपघात प्रसंगी देखील रिक्षाचालक अनेक लोकांना हॉस्पिटलमध्ये नेतात आणि त्यांचे प्राण वाचवतात. असा सेवाभाव त्यांच्यामध्ये दिसतो, त्यामुळे या सांस्कृतिक केंद्रांचे अस्तित्व पुसु नका, असेही त्यांनी सांगितले.

डॉ. अजय दुधाणे म्हणाले, कोरोनाच्या काळात पुण्यातील अनेक स्तरातील लोक पुढे आले आणि त्यांनी इतरांना मदत केली. समाजातील अशा घटकांसाठी संस्थेच्यावतीने मोफत नेत्रतपासणी व चष्मे वाटपाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. त्याचबरोबर संस्थेच्यावतीने असे अनेक उपक्रम राबविण्याचा मानस असल्याचेही त्यांनी सांगितले. छावा संघटनेचे संस्थापक राम घायतिडक यांनी मनोगत व्यक्त केले. दत्तात्रय सोनार यांनी सूत्रसंचालन केले.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading