पुणेकरांचे टेन्शन वाढले; शहरात डेल्टा प्लसचा पहिला रुग्ण आढळला
पुणे : शहरातील कोरोना निर्बंध शिथिल झाल्याने नागरिकांना नुकताच काहीसा दिलासा मिळाला आहे. तर दुसऱ्या बाजूला पुणेकरांचे टेन्शन वाढवणारी बाब समोर आली आहे. कारण शहरात डेल्टा प्लसचा पहिला बाधित आढळून आला आहे. पुणे महापालिकेसह, राज्याच्या आरोग्य विभागातील वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून या माहीतीस दुजोरा देण्यात आला आहे. मात्र, या रूग्णांची माहिती देण्यास नकार दिला आहे.
पुणे जिल्ह्यात डेल्टा प्लसचे 5 रूग्ण असल्याचे राज्याच्या आरोग्य विभागातील अधिकाऱ्यांकडून यापूर्वी स्पष्ट् करण्यात आले. त्यामुळे शहरासह जिल्हयातील आरोग्य यंत्रणा सतर्क झाली असून एका बाजूला उद्या पासून शहरातील निर्बंध मोठया प्रमाणात शिथील होत असतानाच डेल्टा प्लसचा रूग्ण आढळल्याने शहरासाठीची चिंता वाढाली आहे.
दरम्यान, राज्यातील वेगवेगळ्या भागात डेल्टा प्लसचे 66 रुग्ण आढळले आहेत. यामध्ये जळगावला 13, रत्नागिरी 12, मुंबई 11, ठाणे 6, पुणे 6, पालघर 3. रायगड 3, नांदेड 2, गोदिंया 2, आणि चंद्रपूर, अकोला, सिंधूदूर्ग, सांगली, नंदुरबार, औरंगाबात, कोल्हापूर व बीड याठिकाणी प्रत्येकी एक रुग्ण आहे. असे एकूण डेल्टा प्लसचे 66 रुग्ण राज्यात आहेत. यामध्ये दोन्ही डोस घेतलेल्या जवळपास 10 जणांना पुन्हा करोनाच्या डेल्टा प्लसची लागण झाली आहे. 66 पैकी 8 जणांनी लसीचा पहिला डोस घेतला आहे. अशा एकूण 18 लोकांनी लस घेतल्यानंतरी लागण झाली आहे. यामध्ये दोन जणांनी कोव्हाक्सिन घेतली आहे तर 16 जणांनी कोव्हिशिल्ड घेतली आहे.
