समाजवादी विचारांला आधुनिक रुप देण्याची गरज – डाॅ. अभिजीत वैद्य
पुणेः-देशात कुठलाही राजकीय पक्ष आला तरी या देशाला केवळ समाजवादी विचारच वाचवू शकेल. विज्ञानाच्या क्षेत्रात नव्या क्रांती घडत आहेत. समाजवादी विचारांनी ह्या नवीन वैज्ञानिक विचारांशी जोडून घेतले पाहिजे. तरच नव्या पिढीला समाजवादी विचार आकर्षित करू शकेल, असे मत आरोग्य सेनेचे संस्थापक अध्यक्ष डाॅ..अभिजीत वैद्य यांनी व्यक्त केलं.
ज्ञान फाऊंडेशन तर्फे ज्येष्ठ समाजवादी लोकनेते भाई वैद्य यांच्या जयंती निमित्ताने ज्येष्ट सामाजिक कार्यकर्त्या विशाखा खैरे आणि समाजवादी पक्षाचे महाराष्ट्राचे प्रदेशाध्यक्ष कर्मयोगी हसनभाई देसाई यांना अनुक्रमे 2020 आणि 2021 वर्षाचा लोकनेते भाई वैद्य कृतज्ञता पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले त्यावेळी वैद्य बोलत होते. यावेळी व्यासपीठावर ज्ञान फाऊंडेशनचे अध्यक्ष मनोहर कोलते, महावितरणचे अधीक्षक अभियंता राजेंद्र पवार, गितांजली वैद्य, विश्र्वस्त भागवत थेटे,अमरसिंग राजपूत आदी मान्यवर उपस्थित होते.
डाॅ..अभिजीत वैद्य म्हणाले, समाजवादी विचारांची जुनी तत्त्वे आणि सिद्धांत कधीही कालबाह्य होणार नसले तरी बदलत्या काळानुसार आणि नव्या आव्हांना नुसार समाजवादी विचारांनी अधिक आधुनिकता स्वीकारणे सुसंगत होईल.
यावेळी 98 वर्षांचे स्वातंत्र्य सैनिक माधव माने यांचा ही 9 आॅगस्ट च्या क्रांतिदिनानिमित्त विशेष सत्कार करण्यात आला. माने यांनी याप्रसंगी क्रांतीदिनाच्या आठवणींना उजाळा दिला.
ज्ञान फाऊंडेशनचे अध्यक्ष मनोहर कोलते यांनी पुरस्कार देण्यामागची भुमिका स्पष्ट करीत प्रास्ताविक केले.कार्यक्रमाचे सुत्रसंचलन अॅड. संतोष म्हस्के यांनी केले तर आभार भागवत थेटे यांनी मानले.
