Saturday, April 4, 2026
BusinessLatest News

मसालाकिंग डॉ. धनंजय दातार यांना रीटेल एमई आयकॉन्स ॲवॉर्ड  पुरस्कार देऊन गौरव

पुणे : दुबईस्थित अल अदील ट्रेडिंगचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक, मसालाकिंग डॉ. धनंजय दातार यांना रीटेल एमई  माध्यमगृहातर्फे नुकतेच प्रतिष्ठेचा रीटेल एमई आयकॉन्स ॲवॉर्ड हा प्रतिष्ठित पुरस्कार देऊन गौरवण्यात आले. डॉ. दातार यांनी मध्य पूर्व व उत्तर आफ्रिका (मिडल इस्ट अँड नॉर्थ आफ्रिका- मीना) विभागात रीटेल उद्योगाच्या प्रगतीची आकांक्षा बाळगून दिलेल्या योगदानाबद्दल त्यांना हा पुरस्कार देण्यात आला आहे. दुबईच्या बिझनेस बे भागातील जेडब्ल्यू मार्क्विस येथे नुकत्याच झालेल्या शानदार समारंभात रीटेल एमई तर्फे मीना विभागातील आघाडीच्या रीटेल लीडर्सची यादी जाहीर करण्यात आली. डमॅक समूहाच्या प्रकल्प विभागाचे सरव्यवस्थापक मुहम्मद अल– तहैने यांच्या हस्ते व दुबई डिपार्टमेंट ऑफ टुरिझम अँड कॉमर्स मार्केटिंगच्या अलायन्स अँड पार्टनरशिप विभागाच्या मुख्य कार्यकारी अधिकारी लैला मुहम्मद सुहैल यांच्या प्रमुख उपस्थितीत डॉ. दातार यांनी हा पुरस्कार स्वीकारला.

यासंदर्भात प्रतिक्रिया व्यक्त करताना डॉ. दातार म्हणाले की  जगातील अत्यंत विश्वसनीय माध्यमगृहांपैकी असणाऱ्या रीटेल एमई तर्फे आमच्या कामाची दखल घेतली जाणे हा मोठा सन्मान आहे. संयुक्त अरब अमिरातीत भारतीय मसाल्यांबाबत आघाडीचे नाव असलेल्या आमच्या अल अदील समूहासाठीही ही आणखी एक अभिमानास्पद कामगिरी आहे. या पुरस्काराच्या निवडीत अत्यंत कठोर मार्गदर्शक तत्त्वे आचरली जात असल्याने आमच्यावर अधिक उत्तम कामगिरी करुन दाखवण्याची जबाबदारी आली आहे. आमच्या ग्राहकांना सामाजिक जबाबदाररीत्या वर्धित मूल्य मिळवून देण्यासाठी हा पुरस्कार प्रोत्साहक आहे. पुरस्कारासाठी माझी निवड केल्याबद्दल मी रीटेल एमई ला धन्यवाद देतो. हा पुरस्कार हा एकप्रकारे माझी पत्नी सौ. वंदना, मुले हृषिकेश व रोहित आणि अल अदीलचा सर्व कर्मचारीवर्ग यांच्या पाठबळाचेच प्रतिबिंब आहे.

पुरस्कार संयोजकांनी दिलेल्या माहितीनुसार ज्यांची या पुरस्कारासाठी निवड झाली आहे त्या रीटेलर्सनी नेतृत्वाबरोबरच अभिनवतेचेही सुस्पष्ट उदाहरण दाखवून दिले आहे. विभागातील आघाडीच्या रीटेलर्सची ओळख जगाला पटवून देणे, हा या पुरस्कारामागील उद्देश आहे. प्रवर्तक त्यालाच म्हटले जाते जो सुप्त संधी बघतो, पायाभरणीचे धैर्य दाखवतो आणि साहसी शोधक वृत्तीने सीमोल्लंघन करतो. पुरस्कार यादीतील प्रवर्तक हे नवउद्योजक, चालक आणि प्रथम पाऊल उचलणारे असून त्यांनी या क्षेत्राच्या अर्थव्यवस्थेत सर्वोच्च महत्त्वाची भक्कम रीटेल परिसंस्था उभारली आहे आणि त्यामध्ये अल अदील समूहाचाही गौरवपूर्वक समावेश आहे. 

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading