Tokyo Olympics 2020 – 21: बेल्जियम विरुद्ध भारतीय हॉकी संघाचा पराभव; ब्रॉंझ पदकाची आशा कायम
टोकियो : टोकियो ऑलिम्पिकमध्ये भारतीय पुरुष हॉकी संघाला सेमीफायनल्समध्ये पराभवाचा सामना करावा लागला. या विजयाने बेल्जियमने फायनल्समध्ये आपले स्थान निश्चित केले आहे. सेमीफायनलच्या सामन्यात भारताने दोन गोल केले, तर बेल्जियमने पाच गोल करत भारतावर मात केली. यासह भारतीय पुरुष हॉकी संघ गोल्ड आणि सिल्व्हर पदकाच्या शर्यतीतून बाहेर गेला असला तरी अद्यापही ब्रॉंझ पदक जिंकण्याची संधी आहे. दुसऱ्या सेमीफायनलच्या सामन्यात विजयी संघ फायनल्समध्ये खेळणार असून पराभूत संघाचा सामना कांस्य पदकासाठी भारतासोबत होणार आहे.
दरम्यान, भारताचा बेल्जियमविरोधातील सामना सुरू होताच बेल्जियमने पहिला गोल केला. त्यानंतर भारतीय संघानेसुद्धा बेल्जियम विरुद्ध गोल करत बरोबरी केली. यानंतर भारतीय संघाने आणखी एक गोल करत २-१ ने आघाडी घेतली. मग बेल्जियमच्या संघाने गोल करत २-२ ने बरोबरी केली. त्यानंतर पुन्हा बेल्जियमच्या संघाने एका मागे एक असे दोन गोल करत ५-२ ने आघाडी घेत विजय मिळवला.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भारतीय हॉकी संघाचा पराभव झाल्यानंतर ट्विट करत म्हटले, ‘जिंकणे आणि पराभूत होणे हा जीवनाचा एक भाग आहे. टोकियो ऑलिम्पिकमधील पुरुष हॉकी संघाने त्यांचे सर्वोत्तम प्रदर्शन केले आणि तेच महत्त्वाचे आहे. संघाला पुढील सामन्यासाठी आणि त्यांच्या भविष्यातील प्रयत्नांसाठी शुभेच्छा. भारताला आपल्या सर्व खेळाडूंचा अभिमान आहे.’
