Sunday, September 27, 2026
Latest NewsMAHARASHTRA

परभणीच्या जिल्हाधिकारी आंचल गोयलच; मुख्यंमत्री उद्धव ठाकरेंचा स्थानिक नेत्यांना दणका

मुंबई – डॅशिंग आयएएस अधिकारी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या आंचल गोयल याच परभणीच्या जिल्हाधिकारीपदी असतील अशी माहिती परभणी जिल्ह्याचे पालकमंत्री नवाब मलिक यांनी दिली. दोन दिवसांपूर्वी त्या जिल्हाधिकारी पदाचा कार्यभार स्वीकारणार होत्या. मात्र, त्यांना पदभार न स्वीकारता मुंबई ला परतावे लागले होते.

परभणीचे जिल्हाधिकारी दीपक मुगळीकर ३१ जुलै रोजी सेवानिवृत्त झाले. त्यानंतर जिल्हाधिकारी म्हणून आंचल गोयल यांची नियुक्ती करण्यात आली. त्यादिवशी त्या पदभार स्वीकारणार होत्या. मात्र, सामान्य प्रशासन विभागाने त्यांना पदभार घेऊ नका असं सांगितलं. त्यानंतर ही नियुक्ती थांबवण्यात स्थानिक शिवसेना खासदाराने लॉबिंग केल्याची चर्चा सुरू झाली होती. त्यांनतर आंचल गोयल यांनी जिल्हाधिकारी पदाचा कार्यभार स्वीकारावा म्हणून परभणीच्या जागरुक नागरिक आघाडीने आंदोलन केलं  होतं.

दरम्यान, आज मुख्यमंत्र्यांशी चर्चा करुन निर्णय घेतला की आंचल गोयलच परभणीच्या जिल्हाधिकारीपदी असतील. आंचल गोयल यांना रितसर तिथले अतिरिक्त जिल्हाधिकारी त्यांना पदभार देतील, असं मलिक यांनी सांगितलं.

आंचल गोयल यांची परभणी जिल्हाधिकारी पदी नियुक्ती होताच परभणी जिल्ह्यातील सत्तारुढ पक्षाचे काही नेते मंडळींनी सरकार दरबारी स्वतःची प्रतिष्ठा पणास लावली. थेट मंत्रालयात धाव घेत आंचल गोयल यांना पदभार घेण्यापासून दूर ठेवण्याचे प्रयत्न झाल्याचे बोलले जात आहे. त्यानंतर आंचल गोयल यांच्याऐवजी अतिरिक्त जिल्हाधिकारी राजेश काटकर यांच्याकडे जिल्हाधिकारी पदाचा पदभार द्यावा, असे आदेश शनिवारी सायंकाळी सामान्य प्रशासन विभागाचे सहसचिव अजित पाटील यांनी जिल्हाधिकारी दीपक मुगळीकर यांना दिले. मुगळीकर यांनी आपला पदभार राजेश काटकर यांच्याकडे सोपवून निवृत्ती घेतली.


नवाब मलिक म्हणाले, “याबाबत आधिच  आदेश निर्गमित झाले होते. परभणीचे जिल्हाधिकारी म्हणून चार्ज घेण्याबाबत आंचल गोयल माझ्याशी बोलल्या होत्या. त्यांच्या बदलीबाबत काही लोकप्रतिनिधींचा आक्षेप होता. त्यांची बदली करण्यात आली नव्हती. तुम्ही तात्पुरतं थांबा असं त्यांना कळविण्यात आलं होतं. दरम्यान मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याशी बोलून आंचल गोयल यांना पदभार सोपवला पाहीजे यावर चर्चा झाली, यावर मुख्यमंत्र्यांनी होकार दिला. आंचल गोयल यांना हा निर्णय कळविण्यात येईल त्यानंतर त्या जिल्हाधिकारी पदाची जबाबदारी स्विकारतील.”

आंचल गोयल यांना कोणत्या नेत्याचा विरोध होता याबाबत नवाब मलिक यांनी माहिती दिली नाही. मात्र माझा या प्रकरणात हस्तक्षेप नसल्याची माहिती नवाब मलिक यांनी दिली.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading