fbpx
Thursday, April 25, 2024
Latest NewsMAHARASHTRAPUNE

पायरेटेड पुस्तके प्रकरणी ‘मसाप’ चे मुख्यमंत्र्यांना आणि गृहमंत्र्यांना पत्र 

पुणे : दिवसेंदिवस राज्यातील पायरेटेड पुस्तकांचा व्यवसाय आणि विक्री करणाऱ्यांची संख्या वाढत असून त्याचा मोठा फटका  लेखक, प्रकाशकांना आणि पर्यायाने मराठी साहित्य व्यवहाराला बसत आहे. ही अतिशय गंभीर बाब असून  संबंधितांचा शोध घेऊन त्यांच्यावर कडक कायदेशीर कारवाई करण्यात यावी. असे पत्र पुण्याच्या महाराष्ट्र साहित्य परिषदेतर्फे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांना पाठविण्यात आल्याची माहिती कार्याध्यक्ष प्रा. मिलिंद जोशी यांनी दिली.

 पायरेटेड पुस्तकांचा व्यवसाय करणारे व्यावसायिक मराठीतील ख्यातनाम आणि वाचकप्रिय लेखकांची गाजलेली पुस्तके निकृष्ट दर्जाच्या कागदावर छापून त्याची विक्री मोठ्या शहरात  रस्त्यावर आणि पदपथांवर मुलांकरवी खुलेआम करीत आहेत. लेखक, प्रकाशकांबरोबर वाचकांचीही ही फसवणूकच आहे. कारण निकृष्ट निर्मितीमुळे ही पुस्तके लवकरच खराब होतात. कोरोनाच्या विश्वव्यापी संकटामुळे लागलेली टाळेबंदी, ठप्प झालेला साहित्य व्यवहार, ग्रंथालयांचे थकलेले अनुदान, थांबलेली पुस्तक खरेदी, बंद पडलेली ग्रंथ प्रदर्शने यामुळे प्रकाशक, ग्रंथवितरक आणि ग्रंथविक्रेते यांना मोठा आर्थिक तोटा सहन करावा लागत आहे. पायरेटेड पुस्तकांच्या व्यवसाया मुळे त्यांच्या  आर्थिक नुकसानीत भरच पडत आहे. आपल्या कसदार लेखनाने मराठी साहित्याचे दालन समृद्ध करणाऱ्या लेखकांचे  आणि त्यांच्या पुढच्या पिढ्यांचेही रॉयल्टीच्या रकमेत घट झाल्यामुळे आर्थिक नुकसान होत आहे.

गेल्या काही दिवसात व्हॉट्सॲपद्वारे  मराठीतील महत्वाच्या आणि गाजलेल्या पुस्तकांच्या पीडीएफ अनेक समूहांवर लेखक आणि प्रकाशकांच्या पूर्वपरवानगीशिवाय पाठविण्याचे प्रमाण वाढले आहे असे बेकायदेशीर कृत्य करणाऱ्यांचा शोध घेणेही गरजेचे आहे.

पायरेटेड पुस्तकांचा व्यवसाय आणि विक्री करणाऱ्या संबंधितांचा शोध  घेऊन त्यांच्यावर कडक कायदेशीर कारवाई करण्यात यावी.

 असे या पत्रात नमूद करण्यात आले आहे. वाचकांनीही अशा पुस्तक विक्रेत्यांपासून सावध राहून स्वतःची फसवणूक टाळावी असे आवाहन परिषदेतर्फे करण्यात आले आहे.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading