पुणे -सातारा रोडवर पट्टेरी वाघाच्या कातडीची तस्करी करणारी टोळी जेरबंद
पुणे : दुर्मिळ होता चाललेल्या पट्टेरी वाघाच्या कातडीची तस्करी करीत असताना पुणे पोलिसांनी सापळा लावून चार जणांना ताब्यात घेतले आहे. दिनेश अशोक फरांदे (वय 38 रा.मु पो ओझर्डे ता.वाई जि. सातारा), हसन रज्जाक मुल्ला (वय 35 रा.मु पो ओझर्डे ता.वाई जि. सातारा), गणपत सदू जुनगरे (वय 45 रा.देवदेव पो.मामुर्डे ता.जावळी जि. सातारा), )सुनील दिनकर भिलारे (वय 52 रा.भिलार ता.महाबळेश्वर जि. सातारा) अशी ताब्यात घेतलेल्या आरोपींची नावे आहेत. सदर घटनेची माहिती नसरापूर वन विभागचे वन्य जीव रक्षक अधिकारी यांना कळवण्यात आली असून आरोपींना राजगड पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, स्थानिक गुन्हे शाखेचे एक पथक फरारी आरोपीचा शोध घेत असताना गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक पद्माकर घनवट यांना बतमीदारा मार्फत पुणे-सातारा रोडवर सारोळा ब्रीज खाली काही इसम पट्टेरी वाघाची कातडी विक्री करण्यासाठी येणार असल्याची माहिती मिळाली होती. त्यानुसार येथे सापळा लावून सदर चार आरोपींना ताब्यात घेण्यात आले आहे. यामध्ये 4 फूट लांबीचे , दीड फूट रुंदीचे,वरच्या जबड्यात 13 दात व खालच्या जबड्यात 16 दात असे एका पट्टेरी वाघाचे कातडे , एक मोटारसायकल व 4 मोबाईल फोन असे एकूण 5 लाख 26 हजार 100 रुपये किमतीचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला आहे.
सदर ची कामगिरी पोलीस अधीक्षक डॉ. अभिनव देशमुख ,अप्पर पोलीस अधीक्षक मिलींद मोहिते यांचे मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक पद्माकर घनवट ,सहाय्यक पोलिस निरिक्षक माने, अमोल गोरे, हवालदार ज्ञानेश्वर क्षीरसागर, पोलिस नाईक गुरू जाधव,पोलिस कॉन्स्टेबल अमोल शेडगे, मंगेश भगत ,बाळासाहेब खडके,अक्षय नवले, अक्षय जावळे, पूनम गुंड, चालक प्रमोद नवले यांनी केली आहे.
