Tuesday, June 16, 2026
Latest NewsPUNETOP NEWS

वेळेच्या बंधनांविरोधात व्यापारी महासंघाच्या वतीने ३ ऑगस्ट रोजी घंटानाद आंदोलन

पुणे :  दुसऱ्या  लाटेचा धोका लक्षात घेत ५ एप्रिल, २०२१ पासून राज्य सरकारने पुणे शहरात जीवनावश्यक वस्तूंखेरीज बाजारपेठेतील बाकी सर्व व्यवसायांवर वेळेची बंधने आणली. मात्र आता चार महिने उलटून गेले तरीही यामध्ये अपेक्षेप्रमाणे शिथिलता आलेली नाही. एकीकडे शहरातील कोरोना रुग्णसंख्या कमी होत असताना हे निर्बंध लादले जात असल्याने व्यापारी वर्गामध्ये प्रचंड असंतोष आहे. याच पार्श्वभूमीवर झोपेचे सोंग घेतलेल्या सरकारला जागे करीत व्यापारी वर्गाला योग्य न्याय मिळावा यासाठी येत्या ३ ऑगस्ट रोजी दुपारी १२ ते १२.१५ दरम्यान शहरातील सर्व व्यापारी विविध ठिकाणी घंटानाद आंदोलन करणार आहेत.

या आंदोलनानंतर सरकारने दुकानांच्या वेळा वाढविण्यासंदर्भात योग्य निर्णय घेतला नाही, तर बुधवार ४ ऑगस्ट पासून पुणे शहरातील सर्व दुकाने सायं. ७ वाजेपर्यंत उघडी ठेवण्यात येतील अशा इशारा महासंघाच्या वतीने देण्यात आला असल्याची माहिती, अध्यक्ष फत्तेचंद रांका यांनी आज पत्रकार परिषदेत दिली. महासंघाचे उपाध्यक्ष सूर्यकांत पाठक, सचिव महेंद्र पितळीया व पदाधिकारी या वेळी उपस्थित होते.

फत्तेचंद रांका म्हणाले, “ पहिल्या लाटेतून सावरत असताना दुस-या लाटे दरम्यान  महाराष्ट्रात मिनी लॉकडाऊन करण्याचा निर्णय झाला. मात्र परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेत सरकारने संपूर्ण लॉकडाऊन करीत परिस्थिती नियंत्रणात आणावी अशी मागणी व्यापारी महासंघाने केली होती. सरकारने ती मान्य केली नाही. मात्र, तरीही व्यापा-यांनी स्वयंस्फूर्तीने ५ एप्रिल ते ३१ मे, २०२१ दरम्यान बाजारपेठा संपूर्ण बंद ठेवत सरकारला मदत केली. पुणे शहरातील ‘विकेंड लॉकडाऊन’मधून शनिवार वगळण्याचा निर्णय पुढील दोन दिवसांत घेण्याचे सूतोवाच उपमुख्यमंत्री अजित पवार आणि गृहमंत्री दिलीप वळसेपाटील यांनी केले होते. मात्र, महापालिका आयुक्त यांनी शहरातील कोरोना प्रतिबंधक नियम तूर्त ‘जैसे थे’ असा आदेश काढला आहे.

प्रशासनाने सध्या नऊ तास दुकाने उघडे ठेवण्याची मुभा दिली आहे. मात्र या वेळा व्यापाऱ्यांच्या सोईच्या नाहीत. त्त्यामुळे पुणे शहरातील सर्व दुकाने सकाळी ११ ते रात्री ८ वाजेपर्यंत उघडी ठेऊन व्यवसाय करण्यास परवानगी द्यावी. अथवा आठवड्यातील ७ दिवस म्हणजे सोमवार ते रविवार सर्व दुकाने सकाळी ११ ते सायं ७ वाजेपर्यंत उघडी ठेवावीत किंवा सर्व दुकाने आठवड्यातील सर्व दिवस म्हणजे सोमवार ते रविवार उघडी ठेऊन व्यवसाय करण्यास परवानगी द्यावी.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading