fbpx
Thursday, April 25, 2024
Latest NewsMAHARASHTRANATIONAL

लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांनी साम्यवाद आणि संयुक्त महाराष्ट्र विषयक विचार बळकट केले – जयदेव डोळे

नवी दिल्ली : साहित्यातून साम्यवादाचा प्रचार करण्यासोबतच लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांनी संयुक्त महाराष्ट्र चळवळीत अग्रणी सहभाग घेतला. कामगार व दलित मुक्तीप्रमाणेच त्यांनी स्वतंत्र महाराष्ट्र निर्मितीसाठी आपली लेखनी, वाणी आणि आयुष्य झुगारून दिले असे मत, प्रसिध्द लेखक व वक्ते जयदेव डोळे यांनी आज व्यक्त केले.

महाराष्ट्र परिचय केंद्राच्यावतीने आयोजित महाराष्ट्र हीरक महोत्सव व्याख्यानमालेच्या उत्तरार्धात लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जयंती निमित्त ४५वे पुष्प गुंफताना अण्णाभाऊ साठे : साम्यवादी,महाराष्ट्रवादी या विषयावर डोळे बोलत होते.

‘साम्यवाद’ हा अण्णाभाऊ साठेंच्या लेखनाचा व विचाराचा गाभा होता. साहित्यातून साम्‍यवादाचा प्रचार करतानाच ते संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीत अग्रेसर होते.आंतरराष्ट्रीय कामगार एकजुटीचे प्रवक्ते असणारे अण्णाभाऊ साठे हे भाषेच्या आधारावर राज्य निर्माण व्हावे यासाठी संयुक्त महाराष्ट्र चळवळीत उतरले  हे या चळवळीचे व अण्णाभाऊंच्या विशालतेचे मोठ उदाहरण आहे, असे डोळे म्हणाले.

संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीतील अण्णाभाऊंचे योगदान तसेच महाराष्ट्र शासनाने प्रकाशित केलेल्या अण्णाभाऊ साठे यांच्या समग्र साहित्यातील निवडक साहित्याचा डोळे यांनी आढावा घेतला. अण्णाभाऊ साठेंच्या लिखाणात इतिहास आणि वस्तुस्थितीदर्शक मोडतोड केलेली दिसत नसल्याची नोंद करून डोळे यांनी अण्णाभाऊ लिखित, ‘स्टालिन ग्राडचा पोवाडा’ हा आंतरराष्ट्रीय राजकारणाची दखल घेणारा मराठी साहित्याचे अजोड लेणे असल्याचे सांगितले. अण्णाभाऊंनी आंतरराष्ट्रीय घडामोडीचे भान ठेवून देशाला ग्रासणाऱ्या संकटांवर वस्तुस्थिती निदर्शक काव्य केले ‘पंजाब दिल्लीचा दंगा’ हा पोवाडा  त्याचे उत्तम उदाहरण असल्याचे श्री डोळे म्हणाले.

अण्णाभाऊंच्या काव्यात मुंबई, मुंबईतील कामगार, छत्रपती शिवाजी महाराज, महाराष्ट्राचा इतिहास व परंपरा अशा असंख्य गोष्टी येतात. ‘जगबदल घालुनी घाव, सांगूनि गेले मज भिमराव …’  या रचनेवर प्रकाश टाकताना श्री. डोळे म्हणाले ,अण्णाभाऊंच्या या काव्य रचनेची सुरुवात कार्लमार्क्सच्या जगप्रसिध्द उदाहरणाचे वाक्य असून घाव घालून जग बदलायचा संदेश देणारे आहे  तर तो घाव कोणता घालयचा हे डॉ. बाबासाहेब आंबेडकर सांगून जातात.

अण्णाभाऊंनी द्वंद्वात्मक विश्लेषण पध्दतीचा लेखनात प्रयोग केला म्हणूनच त्यांनी लिहिलेल्या एकूण कांदबऱ्यांपैकी १२ कादंबऱ्यांवर चित्रपट तयार झाले आहेत. त्यांची नाटके कमालीची संवादात्मक आहेत त्यांची तुलना ‘गुलामगिरी’, ‘शेतकऱ्यांचा असूड’, ‘तृतीय रत्न’ या महात्मा फुलेंच्या नाटकांसोबत करू शकतो असे डोळे यांनी सांगितले.

 

 

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading