भारतीय संविधानातील समता, स्वांतत्र्य, बंधुभाव ही मूल्ये संत साहित्यात आहेत – ह.भ.प. शामसुंदर महाराज सोन्नर
पुणे : महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती आयोजित आषाढी वारी निमित्त ‘विवेकाची वारी’ या तीन दिवसीय ऑनलाईन व्याख्यानमालेचा काल तिसरा आणि समारोपाचा दिवस होता. ह.भ.प. शामसुंदर सोन्नर महाराज यांचे ‘संतविचार आणि भारतीय संविधान’ या विषयावर व्याख्यान पार पडले.
शामसुंदर महाराज सोन्नर म्हणाले, “संविधानाला काही लोक नाकारण्याचा प्रयत्न करत आहेत अशा परिस्थितीमध्ये लोकांना संविधानाचे महत्त्व समजावून सांगण्याची गरज आहे. ज्या परंपरावादी लोकांना पुन्हा तीच विषमतेची समाज व्यवस्था आणायची आहे, त्यांना सुद्धा संविधानाचे महत्त्व समजून घेणे गरजेचे आहे. माणूस म्हणून जगण्याच्या सामान्य माणसाच्या इच्छेचा आदर करण्यासाठी संविधान टिकले पाहिजे. याच विचारांचा जागर गेली सातशे वर्षे संत साहित्याने केला आहे आणि त्याचाच जागर आज आपण करत आहोत.”
शामसुंदर सोन्नर महाराज पुढे म्हणाले, “समता ही वारकरी समाजाचा मुख्य गाभा आहे. भागवत धर्माच्या या खेळामध्ये सर्व जातीचे वारकरी सहभागी झाले आहेत. आपले संविधान सुद्धा अशा कोणत्याही संकुचित ओळख असलेल्या लिंग, जाती, धर्म, प्रदेशाच्या आधारावर भेद करत नाही. तीच भूमिका आपल्या वारकरी संतांनी मांडली आहे. आपल्या समाजातील प्रत्येक जातीतले आणि धर्मातले संत आहेत. कबीर, लतिफा, शेख महंमद ही मुस्लिम धर्मातील संतांची मोठी नावे आहेत. वारकरी संप्रदायाने मानलेला पाचवा वेद म्हणजे तुकारामांची गाथा प्रकाशित करण्याचे काम ख्रिश्चन असलेल्या ग्रँट अलेक्झांडर यांनी केलं होतं याची या ठिकाणी विशेष नोंद घ्यावी लागेल.”
सोन्नर महाराजांनी असे सांगितले की, वारकरी संप्रदाय नशिबावर विश्वास ठेवण्यापेक्षा कर्मावर भर देणारा आहे. ते म्हणाले, “वारकरी संप्रदाय अशी शिकवण देतो की आपलं काम आपण प्रामाणिकपणे केलं तर भगवंत तुम्हाला मदत करतात. ‘कांदा मुळा भाजी, अवघी विठाबाई माझी’, या संत सावतामाळी यांच्या ओळींवरून कर्तव्याला संतांनी दिलेले महत्त्व दिसून येईल.”
अशोक वानखडे यांनी सुत्रसंचालन केले. बापू शेवकरी यांनी संत तुकाराम यांच्या अभंगाचे गायन केले. राहुल माने यांनी प्रास्तविक केले. मोहन भोईर यांनी परिचय करून दिला. मुंजाजी कांबळे यांनी आभार मानले.
