fbpx
Thursday, April 25, 2024
Latest NewsSports

पंच प्रशिक्षण क्षेत्रात राष्ट्रीय पातळीवरील धोरणांची गरज – पवन सिंह

पुणे : कोणत्याही खेळामध्ये खेळाडू बरोबरच प्रशिक्षक, खेळाशी संबंधित संघटनांचे प्रतिनिधी यांबरोबरच आंतरराष्ट्रीय दर्जाचे ज्युरी अर्थात पंच हे महत्वपूर्ण भूमिका निभावतात.  मात्र आंतरराष्ट्रीय दर्जाचे पंच घडविण्याबाबत आपल्याकडे अद्यापही जागरूकता नाही. खेळाच्या क्षेत्रात भारताला भविष्यात एक नेतृत्व म्हणून पुढे यायचे असल्यास पंच प्रशिक्षणावर भर देत राष्ट्रीय पातळीवरील ठोस धोरणांची आखणी करणे गरजेचे आहे, असे मत टोकियो ऑलिम्पिकच्या ज्युरी अर्थात पंच समितीत निवड झालेले पहिले भारतीय व गन फॉर ग्लोरी या देशातील अग्रगण्य नेमबाजी (शुटींग) प्रशिक्षण संस्थेचे सहसंस्थापक पवन सिंह यांनी व्यक्त केले.

नॅशनल रायफल असोसिएशन ऑफ इंडियाचे (NRAI) संयुक्त महासचिव, इंटरनॅशनल शुटींग स्पोर्टस् फेडरेशन (ISSF) या जागतिक स्तरावर नेमबाजी खेळाचे नियमन करणाऱ्या संस्थेच्या पंच समितीत (ज्युरी) सलग दोन वेळेस स्थान मिळवणारे पहिलेच व एकमेव भारतीय याबरोबरच इंटरनॅशनल शुटींग स्पोर्टस् फेडरेशन (ISSF) तर्फे भारतात आयोजित करण्यात आलेल्या विश्वचषक स्पर्धेचे उत्तमरित्या व्यवस्थापन करणारे अशी पवन सिंह यांची ओळख असून आता टोकियो ऑलिम्पिकमध्ये सहभागी होणा-या १३० देशांमधून निवड करण्यात आलेल्या केवळ २० आंतरराष्ट्रीय पंचांपैकी ते एकमेव व पहिलेच भारतीय आहेत.

याविषयी अधिक माहिती देताना सिंह म्हणाले, “पंच म्हणून काम करण्याची माझी इच्छा होती आणि म्हणूनच २००८ पासून मी या दृष्टीने तयारी करीत राहिलो. आरटीएस ज्युरी (रिझल्ट टायमिंग स्कोरिंग) ही यासाठीची सर्वांत कठीण समजली जाणारी परीक्षा मी चांगल्या गुणांनी उत्तीर्ण झालो आणि इतक्या वर्षांच्या प्रयत्नानंतर  स्वप्नांची कवाडे माझ्यासाठी उघडी झाली. येत्या काही दिवसात होणा-या टोकियो ऑलिम्पिकमध्ये पंच म्हणून सहभागी होण्यासाठी मी उत्साही असून त्या दृष्टीने तयारी देखील सुरू केली आहे.”

ते पुढे म्हणाले की, पंच म्हणून काम करण्याची इच्छा असणा-या अनेकांना या संदर्भात उपलब्ध असलेली अपुरी माहिती मी जवळून अनुभविली. जर आंतरराष्ट्रीय पातळीवरील स्पर्धेत आपल्या देशातील पंच असतील तर स्पर्धेत सहभागी होणा-या खेळाडूंचा आत्मविश्वास वाढतो. इतकेच नव्हे तर स्पर्धेच्या संदर्भात नियमांमध्ये वेळोवेळी होणारे बदल व आपली बाजू आंतरराष्ट्रीय पातळीवर मांडायची झाल्यास अनेक गोष्टींबाबत स्पष्टता या गोष्टी खेळाडूंसाठी महत्त्वाच्या ठरतात, हे मी अनुभविले आणि म्हणूनच पंच प्रशिक्षणाकडे एक महत्त्वाचा घटक म्हणून पाहिले गेले पाहिजे असे मला वाटते.”

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading