fbpx
Thursday, April 25, 2024
Latest NewsPUNE

कन्नड साहित्य परिषदेच्या पुणे शाखेचे उद्घाटन

पुणे : कन्नड भाषा व साहित्याला प्रोत्साहन मिळावे, त्याचा प्रचार व प्रसार व्हावा या उद्देशाने १९१५ साली बंगळूरू येथे स्थापन करण्यात आलेल्या कन्नड साहित्य परिषदेची एक शाखा आता पुणे शहरात देखील सुरू करण्यात आली आहे. नुकतेच ऑनलाईन पद्धतीने कन्नड साहित्य परिषदेचे अध्यक्ष डॉ. मनु बळीगार, महाराष्ट्र विभागाचे अध्यक्ष बसवराज मसुती यांच्या उपस्थितीत पुणे शाखेचे उद्घाटन करण्यात आले. पुण्यातील कन्नड संघाच्या मानद सचिव मालती कलमाडी या सदर पुणे जिल्हा घटक शाखेच्या अध्यक्षा म्हणून काम पाहणार आहेत.

पुण्यातील कन्नड संघाचे अध्यक्ष कुशल हेगडे, मानद सचिव मालती कलमाडी, उपाध्यक्षा व सांस्कृतिक समिती अध्यक्षा इंदिरा सालीयान, सांस्कृतिक समिती सचिव ज्योती कडकोळ, सांस्कृतिक समिती सदस्य चंद्रकांत हारकुडे, संघाचे रामदास आचार्य व जी. सी. कुलकर्णी आदी या कार्यक्रमावेळी उपस्थित होते. पुणे शाखेअंतर्गत पुणे जिल्हा घटक, आंबेगाव व हवेली तालुका घटक येणार असून यांपैकी पुणे जिल्हा घटक व आंबेगाव तालुका घटक यांची जबाबदारी पुण्यातील कन्नड संघावर टाकण्यात आली आहे. तर कर्नाटक संघ हा हवेली तालुका घटकाची जबाबदारी पार पाडणार आहे.

या शाखेच्या सुरू होण्याने पुणे जिल्हा व परिसरातील कन्नड भाषा बोलणा-या नागरिकांना कन्नड साहित्य, संस्कृती यांच्याशी संबंधित कार्यक्रमांची मेजवानी मिळू शकणार आहे. याबरोबरच कन्नड भाषेच्या व साहित्याच्या प्रचार व प्रसाराला देखील आता अधिक चालना मिळू शकेल. नजीकच्या भविष्यात शाखेअंतर्गत संमेलने, परिषदा यांबरोबरच अनेक सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येणार असल्याची माहिती, या वेळी मालती कलमाडी यांनी दिली.    

कार्यक्रमामध्ये शाखेअंतर्गत येणा-या घटकांच्या कार्यकारीणीची देखील घोषणा करण्यात आली. ज्यामध्ये मालती कलमाडी या पुणे जिल्हा घटक अध्यक्षा म्हणून तर ज्योती कडकोळ व नंदिनी राव गुजर या सचिव म्हणून काम पाहतील. आंबेगाव तालुका घटक अध्यक्षपदी बालाजीत शेट्टी तर सचिवपदी पुष्पा हेगडे व चंद्रकांत हारकुडे यांची निवड करण्यात आली आहे. याबरोबरच कृष्णा ममदापूर हे हवेली घटकाचे अध्यक्ष म्हणून तर लता कुलकर्णी व स्वाती ढोले या सचिव म्हणून काम पाहणार आहेत. कर्नाटकातील अनेक जिल्ह्यांबरोबरच महाराष्ट्रात आता पुणे, मुंबई, सोलापूर व अंबरनाथ या ठिकाणी कन्नड साहित्य परिषदेच्या शाखा आहेत.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading