केंद्रीय यंत्रणांना आलेल्या नैराश्यातून अनिल देशमुखांवर कारवाई – शरद पवार
पुणे – राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या घरावर सकाळपासून ईडीने छापे टाकले आहेत. मुंबई, नागपूर या दोन्ही निवासस्थानी छापेमारी सुरू आहे. याप्रकरणी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांची प्रतिक्रिया आली असून केंद्रीय यंत्रणांना आलेल्या नैराश्यातून ही कारवाई सुरू असून आम्हाला त्याची यत्किंचितही चिंता वाटत नाही”, शरद पवार म्हणाले आहेत. पुण्यामध्ये नुकत्याच उद्घाटन करण्यात आलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यालयामध्ये सुबोध मोहिते यांचा राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश झाला. यावेळी ते बोलत होते.
शरद पवार यावेळी म्हणाले की, “ईडी वगैरे आम्हाला काही नवीन नाहीत. अनिल देशमुख काही पहिले नाहीत. अनेकदा सत्तेचा या पद्धतीने वापर करण्याचा पायंडा आत्ताच्या राज्यकर्त्यांनी दाखवला आहे. त्याची आम्हाला यत्किंचितही चिंता वाटत नाही. अनिल देशमुखांवर केंद्र सरकारच्या काही यंत्रणांनी याआधीही कारवाई केली होती. पण त्यातून त्यांना काय हाती लागलं हे मला माहिती नाही. माझ्यामते काहीही हाती लागलं नाही. त्या नैराश्यातूनच अजून कुठून त्रास देता येईल का? या विचारातून हा त्रास देण्याचा हा प्रयत्न आहे. त्याची चिंता करण्याचं आम्हाला काही कारण नाही”, असं शरद पवार म्हणाले आहेत.
“जो विचार आपल्याला मान्य नाही तो विचार दडपण्याचा प्रयत्न या प्रकारच्या यंत्रणा वापरून केला जातो. हे काही नवीन नाही. अनेक राज्यांमध्ये देखील आणि महाराष्ट्रात देखील यापूर्वी आपण कधी हे पाहिलं नव्हतं. केंद्राची सत्ता यांच्या हातात आल्यानंतर आपण या सगळ्या गोष्टी पाहायला लागलो. मला वाटतं याचा काही परिणाम होणार नाही. लोक देखील त्याची गांभीर्याने नोंद घेत नाही”, असं देखील शरद पवार यावेळी म्हणाले.
