अजित पवार, अनिल परब यांची सीबीआय चौकशी करावी; भाजप कार्यकारिणी चा ठराव

मुंबई : गेल्या काही दिवसांत भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील हे अजित पवार यांना टार्गेट करत आहेत. आता राज्य कार्यकारणीनेच पवार यांच्या सीबीआय चौकशीची मागणी केल्याने राज्यभर भाजपकडून सरकारचा करेक्ट कार्यक्रम करण्याचे संकेत विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस आणि प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी गुरुवारी दिले.

अजित पवार यांच्याप्रमाणेच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याजवळ राबता असणारे परिवहन मंत्री अ‍ॅड. अनिल परब यांचीही सीबीआय चौकशी करावी अशी मागणी भाजपने केली आहे. त्यामुळे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांना घेरण्याचा कार्यक्रम भाजपने सुरु केला असून येणारे दोन दिवसांचे पावसाळी अधिवेशन ठाकरे सरकारला जड जाण्याची शक्यता आहे.

मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना लिहिलेल्या पत्रात राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर खंडणीचे आरोप केले होते. त्यामुळे भारतीय जनता पक्षाने त्यांना लक्ष्य करत त्यांच्या राजीनाम्याची आणि सीबीआय चौकशीची मागणी केली होती. अनिल देशमुख यांची गृहमंत्रीपदावरून गच्छंती केली असताना आता भाजपने आपला मोर्चा उपमुख्यमंत्री अजित पवार आणि परिवहन मंत्री अ‍ॅड. अनिल परब यांच्याकडे वळवला आहे. बडतर्फ पोलीस अधिकारी सचिन वाझे याने लिहिलेल्या चार पानी पत्रात अजित पवार आणि अनिल परब यांच्यावर पैसे वसुलीची आरोप केला होता. त्यामुळे या दोन मंत्र्यांची सीबीआय चौकशी करावी, असा ठराव भाजपच्या प्रदेश कार्यकारणीच्या बैठकीत मंजूर करण्यात आला आहे. त्यावरून आता भाजप रान उठवणार हे निश्चित झाले आहे.

परमबीर सिंह यांनी मुख्यमंत्र्यांना लिहिलेल्या पत्रात अनिल देशमुख यांनी पैसे वसुलीचे आदेश दिल्याचे लिहिले होते. त्यावरून अनिल देशमुखांची सीबीआय चौकशी होऊन त्यांना गृहमंत्रीपदावरून काढून टाकण्यात आले. तसाच आरोप सचिन वाझे याने चार पानी पत्र लिहून केला होता. आपल्याला अजित पवार आणि अनिल परब यांनी पैसे वसुलीचे आदेश दिले होते, असे वाझेने आपल्या पत्रात म्हटले होते. त्यामुळे पैसे वसुलीच्या प्रकरणात अजित पवार आणि अनिल परब यांचीही सीबीआय चौकशी करावी, अशी मागणी भाजपच्यावतीने करण्यात येणार आहे. तसा ठराव गुरुवारी झालेल्या भाजप कार्यकारणीच्या बैठकीत करण्यात आला. अजित पवार आणि अनिल परब यांची सीबीआय चौकशी करण्याची मागणी आता महाराष्ट्र राज्य भाजपकडून केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्याकडे करण्यात येणार आहे. तसेच या मागणीसाठी आंदोलन करण्याचा पवित्राही घेण्यात येणार असल्याचे सुतोवाच प्रदेश भाजपकडून करण्यात आले.

Leave a Reply

%d bloggers like this: