करोनाच्या तिसऱ्या लाटेशी लढण्यासाठी सरकारने तयार राहावे, राहुल गांधींनी सादर केली कोरोनावरील श्वेतपत्रिका

नवी दिल्ली : संपूर्ण देशाला कोरोनाची तिसरी लाट येणार असल्याचे माहित आहे, त्यामुळे सरकारने त्यासाठी तयार राहावे असा आमचा आग्रह आहे. या पार्श्वभूमीवर आम्ही कोरोनावर श्वेतपत्रिका  काढली आहे. याचा हेतू सरकारकडे बोट दाखवत टीका करण्याचा नसून देशाला कोरोना संसर्गाच्या तिसऱ्या लाटेचा सामना करण्यात मदत करण्याचा आहे. विषाणू सतत बदलत असून सरकारला पुढील मार्ग सुचवावा हाच या श्वेतपत्रिकेचा हेतू आहे, असे काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी आज पत्रकार परिषदेत सांगितले.  

कोरोनाच्या संभावित तिसऱ्या लाटेचा सामना करण्यासाठी कॉँग्रेसच्यावतीने एक श्वेतपत्रिका प्रसिद्ध करण्यात आली. यावेळी ते बोलत होते. 

राहुल गांधी म्हणाले, पहिल्या आणि दुसऱ्या लाटेत कोरोनाशी लढताना करण्यात आलेलं व्यवस्थापन वाईट होतं. आम्ही ती कारणं या श्वेतपत्रिकेच्या माध्यमातून समोर आणण्याचा प्रयत्न केला आहे. तिसरी लाट आल्यास नेमकं काय करावं हे सांगणारी ही ब्ल्यूप्रिंट आहे.’ तसेच ‘कोरोनामुळे मृत्यू झालेल्यांपैकी ९० टक्के लोकांचा जीव वाचवता आला असता. यामागचं सर्वात मोठं कारण ऑक्सिजनचा तुटवडा होतं. सध्या देशात ऑक्सिजनचा तुटवडा नाही. पंतप्रधानांचे अश्रू लोकांचे जीव वाचवू शकत नाही पण ऑक्सिजन वाचवू शकतो’, अशी टीकाही त्यांनी यावेळी मोदी सरकारवर केली.

दुसऱ्या लाटेचा सामना करताना नेमक्या काय चुका झाल्या याची संपूर्ण माहिती यामध्ये आहे. तसेच तिसऱ्या लाटेचा सामना करण्यासाठी यामध्ये  तज्ज्ञांशी चर्चा करून चार खांब विकसित केले आहेत. यामध्ये लसीकरण हा मुख्य खांब आहे. आक्रमकपणे आणि १०० टक्के लसीकरण करणे अत्यंत महत्त्वाचे आहे. रुग्णालये, ऑक्सिजन, औषधे या सर्व गोष्टी उपलब्ध असल्या पाहिजे. तर दुसरा खांब श्वेतपत्रिका आहे ज्यामध्ये रुग्णांसाठी गरजेची असणारी औषधे, ऑक्सिजन, व्हेंटिलेटर्स, बेड्स उपलब्ध आहेत याची खातरजमा करणे आहे. तसेच दुसऱ्या लाटेत झालेल्या चुका समजून घेत त्या दुरुस्त करणे महत्त्वाचे असल्याचे राहुल गांधींनी सांगितले.

Leave a Reply

%d bloggers like this: