आषाढी वारी दरम्यान पंढरपूरात संचारबंदी तर सोलापूरात त्रिस्तरीय नाकाबंदी
पंढरपूर : करोनाचा वाढता प्रादुर्भाव व आषाढी वारीच्या पार्श्वभूमीवर 17 ते 25 जुलै दरम्यान पंढरपूरात संचारबंदी लागू करण्यात आली आहे. तर सोलापूरात त्रिस्तरीय नाकाबंदी करण्यात येणार आहे. त्यामुळे पूर्व परवानगी शिवाय कोणालाही या काळात सोलापूर जिल्ह्यात प्रवेश मिळणार नाही.
या काळात भाविकांची होणारी संभाव्य गर्दी लक्षात घेता. गर्दी टाळण्यासाठी प्रशासनाच्या वतीने हे निर्बंध घालण्यात आले आहेत. त्यामुळे यंदाही वारकऱ्यांना आपापल्या घरातच आषाढी वारी साजरी करावी लागणार आहे.
मागील वर्षी प्रमाणे यंदाही पायी वारी होणार नसून, मानाच्या पालख्यांना बसने वाखरीपर्यंत पादुका नेण्याचं नियोजन सरकारने केलेल आहे. वाखरीवरून प्रतिकात्मक स्वरूपात पालख्या पायी पंढरपूरला जाणार आहेत. केवळ वाखरी ते पंढरपूर दीड किलोमीटर दिंडी पायी येणार असून एकादशी दिवशी शहरातील 195 महाराज मंडळींना देवाचे मुखदर्शन मिळणार आहे. यंदाच्या वर्षी सर्व मानाच्या पालखी सोहळ्यांचे पंढरपूरमध्ये दशमीच्या दिवशी आगमन होईल तर पौर्णिमेच्या दिवशी प्रस्थान करण्यास मान्यता देण्यात आली आहे. शासकीय महापूजा, विठ्ठलाशी संतांच्या भेटी गेल्यावर्षीप्रमाणेच करण्यात येणार आहे. तर आषाढी यात्रा कालावधीत भाविकांसाठी दर्शन बंद ठेवण्यात येणार आहे.
