‘जय गणेश’ वर्गातील मुलांनी घेतले योगासनांचे धडे

पुणे : चक्रासन…संपूर्ण हनुमानासन…भुजंगासन…गोमुखासन…शिर्षासन…अर्धमत्स्येन्द्रासन…उदराकर्षण…शंखसन अशी विविध आसने सादर करीत सिद्धेश कडू या चिमुकल्याने देहविक्री करणाऱ्या महिलांच्या मुलांना योगासनांचे धडे दिले. अवघड आसानांचे प्रकार सहजपणे करताना पाहून जय गणेश व्यासपीठाच्या शाळेत शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांनी जल्लोष करीत त्याला टाळयांच्या कडकडाटात प्रतिसाद दिला.

जय गणेश व्यासपीठाच्या वतीने बुधवार पेठेतील गुजराती शाळेत देहविक्री करणाऱ्या महिलांच्या मुलांसाठी शाळा सुरु करण्यात आली आहे. या विद्यार्थ्यांना योगासनांचे महत्त्व कळावे यासाठी आंतरराष्ट्रीय स्तरावर योगासनांची प्रात्यक्षिके सादर करणाऱ्या सिद्धेश कडू याने योगासनांचे सादरीकरण केले. यावेळी योगगुरु विठ्ठल कडू, शिरीष मोहिते, पीयुष शाह, जय जवान मित्र मंडळाचे अमोल सारंगकर, पोटसुळ्या मारुती मंडळाचे कुणाल पवार, ऑस्कर मित्र मंडळचे सौरभ घोगरे, राष्ट्रीय साततोटी  हौद मंडळाचे स्वप्नील दळवी, शिवशक्ती मंडळचे (नाना पेठ) प्रमोद राऊत, अष्टविनायक मित्र मंडळचे (नवी पेठ) प्रणव नवले व किरण सोनिवाल, प्रशांत पंडित,  पृथ्वीराज येळवंडे, रोहिणी कदम, सुवर्णा पोटफोडे, उमेश सपकाळ, अक्षय नवले, अक्षय शिंदे, किरण नायकोजी, आनंद मित्र मंडळाचे (कसबा पेठ) सुनील आढव आणि कार्यकर्ते उपस्थित होते. कार्यक्रमाचे आयोजन व संकल्पना पियुष शाह यांची होती.

योगगुरु विठ्ठल कडू म्हणाले, आपले योगशास्त्र संपूर्ण जगाने स्विकारले आहे. योग हा सर्वांसाठी उपयुक्त आहे. ओमकाराचे महत्व नासाने देखील मान्य केले. त्यामुळे प्रत्येकाने घरी ओमकार करायला हवा. शरीरशास्त्रासाठी ओमकार हा आवश्यकच आहे, असेही त्यांनी सांगितले.

पीयुष शाह म्हणाले, मुलांना गुणात्मक शिक्षण मिळावे, या हेतूने जय गणेश व्यासपीठाच्या वतीने शाळेची सुरुवात करण्यात आली आहे. या शाळेच्या माध्यमातून मुलांना विविध गोष्टी शिकविण्यात येत आहेत. आंतरराष्ट्रीय योगा दिनाच्या निमित्ताने योगाचे महत्त्व विद्यार्थ्याना सांगून प्रात्यक्षिके देखील करुन दाखविण्यात आली. शिरीष मोहिते यांनी आभार मानले.

Leave a Reply

%d bloggers like this: