नियमांचे काटेकोर पालन व लसीकरण आवश्यक

माझे परिवारातील फक्त माझी मुलगी जी डॉक्टर असल्याने व तिला तिचे वैद्यकीय सेवेचे कर्तव्य पार पाडण्यासाठी, त्यामुळे केवळ ती सोडून आम्ही परिवारातील सर्वांनी दिनांक ५ नोव्हेंबर २०२० रोजी “Jan Aandolan For Covid-19 Appropriate Behaviour ” ही शपथ घेतलेली आहे. यामुळेच जरी सामाजिक कार्यकर्ता असलो तरीसुद्धा साधारणतः मागील एक वर्ष गर्दीच्या ठिकाणी न जाता तसेच बहुतेक करुन कोणत्याही कार्यक्रमात सहभागी होण्याचे देखील आम्ही टाळलेले आहे. आम्ही घेतलेली शपथ व त्याची काटेकोरपणे अंमलबजावणी व्हावी यासाठी आमचेकडून आज देखील अतिशय प्रामाणिकपणे प्रयत्न होत आहेत. सध्याच्या अशा वातावरणात जेव्हा कधीतरी एखादी व्यक्ती हस्तांदोलन करण्यासाठी किंवा जवळ येऊन संवाद साधण्याचा प्रयत्न करत होती तेव्हा मी त्यांना लांबूनच हात जोडून नमस्कार करत होतो व “Jan Aandolan For Covid-19 Appropriate Behaviour” ही शपथ घेतली असल्याने व याचा आपल्या सर्वांना फायदाच होत असल्याचे मी अशा व्यक्तींना आज देखील आवर्जून सांगत आहे.
किमान आम्हाला आज तरी याचा फायदाच झाल्याचा अनुभव आहे, उद्याचे मला माहीत नाही.

काही महिन्यांपासूनच्या अशा वातावरणात आम्ही शपथेप्रमाणे/नियमानुसार वागत असल्याने साहजिकच काही लोकांना आमचा थोडासा राग किंवा आमच्या अशा या वागण्याची अतिशयोक्ती वाटत असल्याचे साधारणतः त्यांचे वागण्यातून आम्हाला दिसून येत होते. त्यांच्या त्या रागाचा किंवा त्यांचे अतिशयोक्ती वाटण्याचा आम्ही कधीच विचार देखील केला नाही. आता याच काही लोकांना या शपथेचे किंवा आम्ही पाळत असलेल्या अशा वचनबध्द्तेचे, नियमांचे महत्त्व सध्याचे वातावरणात किती आवश्यक आहे हे समजत असल्याचे आम्हाला दिसून येत आहे.

मंगळवार दिनांक २७ एप्रिल २०२१ रोजी आम्ही लसीकरण केंद्रांवर सकाळी ६.३० च्या दरम्यान पोहचलो. आमचे पुढे २०-२२ नागरिक होते. बहुतेक सर्वजण सध्याचे वातावरणात आवश्यक असे शारीरिक अंतर ठेवून उभे होते. आमच्या मागे येणाऱ्या, उभे राहणा-या काही जणांना शारिरीक अंतर ठेवा अशी विनंती केली ते देखील अंतर ठेवून उभे राहिले. नंतर जसजशी गर्दी वाढत गेली; मागे वळून काही अंतरावर पाहिल्यावर काहीजण एकमेकांचे जवळ उभे राहिले असल्याचे दिसून येत होते. सकाळी ६.३० च्या दरम्यान लसीकरण केंद्रांवर पोहचल्यावर लसीचा डोस घेऊन साधारणतः १०.४५ वाजता म्हणजेच जवळजवळ ४ तासानंतर लसीकरण केंद्रातून आम्ही बाहेर पडलो.
लसीकरण केंद्रांवर होणा-या गर्दीतूनच संसर्ग होण्याची शक्यता देखील नाकारता येत नाही. लसीकरण केंद्र संसर्गाचा केंद्रबिंदू होऊ नये यासाठी लसीच्या पहिल्या व दुसऱ्या डोससाठी वेगवेगळ्या वेळा / कोव्हीशिल्ड व कोव्हॅक्सिन या लसींसाठी वेगवेगळी अशी केंद्र स्थापन करणे आवश्यक आहे. लसीच्या पहिल्या डोससाठी येणारे व लसीच्या दुसऱ्या डोससाठी येणारे नागरिक विभक्त झाल्यास लसीकरण केंद्रांवरील गर्दी थोडी कमी होऊन पर्यायाने काही प्रमाणात का होईना संसर्गापासून अटकाव होण्यास मदत देखील होईल असे प्रामाणिकपणे वाटते. लसीकरण केंद्रांवरील गर्दी नियंत्रणासाठी तसेच सध्या आवश्यक असणा-या नियमांचे नागरिकांकडून काटेकोरपणे पालन होण्यासाठी प्रत्येक लसीकरण केंद्रांवर पोलिस प्रशासनाची मदत घेणे गरजेचे आहे असे वाटते.

नियमांचे पालन करणे , स्वच्छ असणे/राहणे हे जितके महत्त्वाचे तितकेच ते फायदेशीर देखील आहे असे प्रामाणिकपणे वाटते.

– नरेंद्र सोपानराव मते

सामाजिक कार्यकर्ता,
पुणे.

Leave a Reply

%d bloggers like this: