अहमदनगर येथे अल्पसंख्याक विद्यार्थीनींसाठी वसतिगृह बांधण्यास मान्यता

मुंबई : अल्पसंख्याक समाजातील उच्च शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थीनींकरिता अहमदनगर येथील शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेच्या आवारात १०० प्रवेश क्षमतेचे वसतिगृह बांधण्यास प्रशासकीय मान्यता देण्यात आली आहे. लवकरच निविदा प्रक्रिया आणि इतर प्रशासकीय प्रक्रियेची पूर्तता करून या वसतीगृहाच्या बांधकामास सुरुवात करण्यात येईल, अशी माहिती अल्पसंख्याक विकास मंत्री नवाब मलिक यांनी दिली.

अल्पसंख्याक मुस्लिम, ख्रिश्चन, बौद्ध, शीख, जैन, पारसी आणि ज्यू समाजातील उच्च शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थीनींना या वसतिगृहाचा लाभ होणार आहे. या बांधकामासाठी १२ कोटी ९२ लाख रुपये इतक्या खर्चाच्या अंदाजपत्रकासही प्रशासकीय मान्यता देण्यात आली असल्याचे मलिक यांनी सांगितले.

मलिक म्हणाले, अहमदनगर, पुणे, औरंगाबाद, नाशिक  परिसरातील एक मध्यवर्ती शैक्षणिक केंद्र आहे. राहण्याची सोय नसल्याने येथे शिक्षणासाठी येणाऱ्या विद्यार्थिनींना त्रास सहन करावा लागतो. याची दखल घेवून हा निर्णय घेण्यात आला आहे.  यासंदर्भातील शासन निर्णय आज  काढण्यात आला आहे.

राज्यात 23 ठिकाणी वसतिगृहे सुरु

अल्पसंख्याक समाजातील उच्च शिक्षण घेणाऱ्या मुलींकरिता सध्या राज्यातील वेगवेगळ्या जिल्ह्यांमध्ये 23 ठिकाणी वसतिगृहे सुरु आहेत. या वसतिगृहांमध्ये मुलींसाठी सुविधा शुल्क माफ करण्याकरीता आवश्यक असलेली कुटुंब वार्षिक उत्पन्न मर्यादा नुकतीच अडीच लाख रुपयांवरून 8 लाख रुपये करण्यात आली आहे. या 23 वसतिगृहांची संपूर्ण माहिती https://mdd.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.

Leave a Reply

%d bloggers like this: